Monday, December 17, 2007

गव्हाची खीर (Gavhachi kheer)

GavhachI kheer

हा प्रकार माझ्या अतिशय आवडीचा त्यातल्या त्यात माझ्या आज्जीच्या हातचा. आता आज्जी नाही त्यामुळे मग ती खास मायेची चव नाही पण तरीही कधीही केली तरी तिची आठवण करूनच खाल्ली जाते.

ह्या खिरीसाठी गहू कांडून दलिया सारखा करतात. त्यासाठी गहू पाणी लावून थोडे ओलसर करायचे म्हणजे कोंडा पट्कन सुटून येतो. असे पाणी लावून एक अर्धा तास ते गहू ठेवतात. मग उखळात कांडतात. असे केल्याने कोंडा निघून येतो. तो पाखडून काढतात. कांडताना  गव्हाचे तुकडे होतात, साधारण दलियाहुन थोडे मोठे असे. मग ते गहू हुग्गी (कानडी शब्द) म्हणजेच खीर करायला वापरतात. सहसा ही खीर खपली गव्हाची करतात. जर खपली गहू मिळत नसेल तर सध्या गव्हाचे पण केले जाते. पण मग ते शिजायला घालताना थोडे तांदूळ घालतात म्हणजे खीर मिळून येते. मी आज्जी आणि मम्मी बरोबर गहू कांडलेले आहेत एकेकाळी. कष्ट असतात खूप - पण चव अप्रतीम अर्थात!!

इथे भारतातल्या सारखे खपली गहू, सडण्यासाठी उखळ वगैरे काहीही नाही आणि करायला वेळही नाही (!) म्हणून मी ही खीर आजकाल दलीयाची करते.

Gavhachi Kheer


1 कप मध्यम जाड गव्हाचा रवा (दलीया किंवा Cracked wheat)
2 कप चिरलेला गुळ
3 कॅन नारळाचे दूध
3-4 वेलदोडे
3-4 केशर काड्या
छोटा तुकडा जायफळ
1/4 वाटी खसखस
1/4 वाटी सुके खोबरे
2-3 चमचे तूप
1 कप पाणी
1/4 वाटी बदाम, पिस्ते, काजूचे काप
10-15 बेदाणे

कृती -
गव्हाच्या रव्याला 1/4 चमचा तेल आणि चिमुटभर हळद चोळुन घ्यावी. 10 मिनीटे तसेच ठेवून पाण्याने एकदा रवा धुवून घ्यावा. त्यात एक कप पाणी घालून कुकर्मधे ठेवून 1 शिट्टी करून घ्यावी. कुकर गार होईपर्यंत खसखस वा खोबरे वेगवेगळे भाजून वेगवेगळे बारीक करून बाजूला ठेवावे. गुळ चिरून घ्यावा. कुकर गार झाला की शिजलेला रवा चमच्याने उपसून किंचीत मोकळा करून घ्यावा. एका जाड बुडाअच्या पाटेल्यात चिरलेला गुळ घालून त्यावर 2 चमचे तूप घालावे आणि मध्यम आचेवर पाक करायला ठेवावा. तूप वापरायचे नसेल तर 3-4 चमचे पाणी घातले तरी चालते. साअधरण कच्चा पाक तयार झाला की त्यात शिजलेला गव्हाचा रवा घालून ढवळावे आणि जर गातही असतील तर त्या मोडून घ्याव्यात. त्यावर नारळाच्या दुधाचे कॅन उघडुन एकेक करून ओटावा. खसखस वा खोबर्याचे कूट घालावे. एका वेगळ्या कढईत साधारण 1 चमचा तूप घालून त्यावर काजू-बदामाचे काप गुलाबी रंगावर भाजून ते खिरीमधे घालावेत. बेदाणे, वेळची, जायफळ आणि केशर थोडे जाडसर बारीक करून त्यावर घालावे. गॅस बारीक करून खीर उकळु द्यावी. मधून मधून ढवळत राहावे नाहीतर खाली लागण्याचा संभव असतो. साधारण 5 मिनीटानी गॅस बंद करावा.


टीप - 
  1. नारळाच्या दुधाऐवजी साधे दूध (fat free, 1% वगैरे) घातले तरी चालते. 1 कप रव्याला साधारणपणे 4 कप दूध लागते.
  2. नारळाचे दूध घरी काढून मी कधी खीर केली नाहीए त्यामुळे ते प्रमाण देऊ शकत नाही.
  3. नारळाचे दूध आजकाल lite प्रकारचे पण मिळते ते वापरले तरी चालेल.
  4. ह्या खिरीसाठी गुळच चाMगला लागतो साखर घातलेली खीर चांगली लागत नाही

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...