Wednesday, October 31, 2007

Corn Flakes चिवडा

दिवाळी आली घरोघरी पदार्थांचे नमुने बनायला लागतात. दूरदेशी राहील्याने आमच्यासारख्या नोकरी करणा-याना दिवाळीची सुट्टी नसते त्यामुळे नमुन्यापुरते का होईना एखादा पदार्थ करुन पहाण्याएवढा वेळही मिळत नाही. मग बरेचसे पदार्थ घरात असणा-या सामुग्रीपासुन झटपट कसे करता येतील याचे प्रयोग चालु असतात. माझा त्यातलाच हा ६ एक वर्षापुर्वीचा प्रयोग--


५ कप Kellogg's corn flakes
फोडणी साठी जरा जास्ती तेल (५ ते ६ Tbsp )
फोडणीसाठी कढिपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, तिळ, खसखस, हळद
डाळं, भुईमुगाचे दाणे, काजुचे काप प्रत्येकी अर्धा कप
काळे बेदाणे पाव कप
जिरे पावडर, धणे पावडर प्रत्येकी २ tsp
साखर १ चमचा,
लाल तिखट, मिठ चवीप्रमाणे

सर्व साहित्य काढुन ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून हळद सोडुन बाकी सर्व फोडणीचे साहित्य घालुन मंद गॅस वर फोडणी करावी. त्यात दाणे, काजु घालुन थोडावेळ परतावे. ते लालसर रंगावर भाजले की त्यात हळद, डाळे, व बेदाणे घालावेत. बेडाणे फुलुन येईपर्यन्त चांगले परतावे.
गॅस वरुन पातेले बाजुला घेउन त्यात २ ते २.५ कप corn flakes घालावेत. त्यावर मीठ, तिखट, जिरे, धणे पावडर घालावी. वर राहिलेले flakes घालावेत. गॅस वर न ठेवता सर्व मिश्रण व्यवस्थित हलवावे. आता पातेले मंद गॅस वर ठेवुन चांगले ५ ते ७ मि. हलवावे. गॅस बंद करुन पातेले बजुला काढुन ठेवावे. ५-१० मिनीटे सतत हलवत रहावे. पातेले गरम असल्याने चिवडा करपण्याची शक्यता असते. तोपर्यन्त चिवडा थोडा थंड होईल त्यावर साखर घालुन एकदा नीट हलवावे.
मक्याचा झटपट चिवडा तयार!!!

टीप -
१. कोणत्याही अगोड cereal चा ह्याप्रकारे चिवडा करता येईल.
२. अर्धे लिम्बु फ़ोडणीमधे पिळुन ते पूर्ण तडतडू द्यावे. त्याचा अंबटपणाही अतिशय छान लागतो. पण लिंबुरस जर नीट तडतडला नाही तर चिवडा मऊ पडु शकेल.

Saturday, October 13, 2007

किनवा पुलाव (Quinoa Pulav)

Quinoa (किनवा) हे एक धान्य हाय प्रोटीन धान्य आहे. न्युट्रिशनिस्टच्या मते ह्या धान्याचा उपयोग रोजच्या जेवणात असावा. सध्या ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालु आहेत.
हे धान्य असे दिसते -Quinoa


मी केलेला पुलाव असा दिसत होता -
किनवा पुलाव


१ कप किनवा
२ कप पाणी
३-४ हिरव्या मिरच्या चिरुन
१ चमचा तेल
फोडणीचे साहित्य
चवीपुरते मीठ
१/२ चमचा गरम मसाला

कृती - किनवा पाण्यात धुवु्न घ्यावा. तेलाची फोडणी करुन मिरच्या घालाव्यात. त्यात किनवा घालुन २ ते ३ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात पाणी, मीठ, गरम मसाला घालावा. साधारण ५ मिनिटे ते मोठ्या आचेवर उकळावे. त्यावर गॅस बारीक करुन झाकण लावावे आणि पूर्ण शिजु द्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.


टीप -
१. हे धान्य साधारण ज्वारीसारखे दिसते दाणा बारीक असतो.
२. शिजलेल्या किनवा साधारण शिजलेल्या गव्हाच्या रव्यासारखा दिसतो.
३. किनवा भिजवुन साधारण ५-६ तास ठेवला तर त्याला मोड येतात.
४. ह्या धान्याचे भारतीय नाव काय आहे ते माहीती नाही.

Thursday, October 11, 2007

फोडणीचे आंबट वरण (ambat Varan)

ambat Varan


श्रावण सोमवारी घरी लवकर यायला मिळे आणि घरी स्वयंपाकही पूर्ण तयार असे. त्यातले हे फोडणीचे वरण म्हणजे माझा जीव की प्राण. सकाळी जाताना साबुदाणा खिचडीपेक्षा संध्याकाळच्या ह्या वरणाचे जास्ती अप्रुप असे.

१ वाटी तुर डाळ - कुकरला मऊ शिजवुन घेतलेली
३-४ टेबलस्पून ओले खोबरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ पाकळ्या लसुण
छोटा आल्याचा तुकडा
लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
१ छोटा तुकडा गूळ
मुठभर कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टेबलस्पून गोडा मसाला
फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद

कृती -
मिरची, आले, लसुण, खोबरे आणि थोडी कोथिंबीर बारीक वाटुन घ्यावी. तेलाची नेहेमीप्रमाणे फोडणी करुन घ्यावी. त्यात शिजवलेली डाळ चमच्याने घाटुन घालावी. त्यात मीठ, चिंचेचा कोळ, खोब-याचे वाटण, मसाला, आणि गुळ घालावे. वरण जितके कमी जास्त घट्ट पाहिजे त्याप्रमाणात पाणी घालुन नीट उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी. गरम गरम भाताबरोबर खावा.

टीप -
उन्हाळ्यात चिंचेच्या कोळाऐवजी एखादी कैरी खिसुन घातली तरी अप्रतीम होते.

Saturday, October 06, 2007

भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड (Falafel and Salad - Indian Style)

ही रेसिपी मी मायबोलीच्या २००७ च्या गणेशोत्सवातील पाककला स्पर्धेमधे दिली होती. (३० मिनिट मील अशी स्पर्धा होती)

तयारीसाठी वेळ - साधारण १०-१५ मिनीटे
वाफ़वण्यास लागणारा वेळ - १५ मिनीटे
फलाफल -
साहित्य -
१ जुडी मेथी (बारिक चिरुन) किंवा फोझन मेथी २ वाट्या
१/२ वाटी कणिक (चपातीचे पीठ)
१/२ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ चमचा जिरे
१/२ चमचा हळद
१/२ वाटी दही
चविप्रमाणे मीठ

कृती -

* गॅसवर चाळणी ठेवता येईल इतक्या पातेल्यात साधारण १ ते दीड लिटर पाणी तापायला ठेवावे.
* मिरची, लसुण, मीठ, आणि जिरे एकत्र बारीक करुन घ्यावेत.
* परातीमधे किंवा मोठ्या बाउलमधे मेथी मधे दही घालुन बारीक केलेले वाटण घालुन नीट मिसळुन घ्यावे.
* त्यात हळद आणि तांदुळाचे पीठ घालावे.
* थोडी थोडी कणिक घालत मळावे. भाजी फ़क्त एकत्र मिळुन यावी इतपत घट्ट असावे. खुप पीठ घालु नये.
* शेवटी हाताला थोडे पाणी लावुन ते नीट गोळा करावे.
* ह्या पीठाचे छोटे छोटे मुटके करुन तेल लावलेल्या चाळणीत घालुन ती चाळण उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी.
* त्यावर झाकण ठेवुन १५ मिनीटे वाफवुन घ्यावेत.

इतर साहित्य -
१ काकडी चकत्या करुन
१-२ टोमॅटो चकत्या करुन
१ वाटी चिरलेला लेट्युस (असेल तर)
१ वाटी दही
१ काकडी खिसुन पाणी पिळुन काढुन फक्त खीस घ्यावा
१/२ चमचा जिरेपुड
चविप्रमाणे मीठ, साखर
टोमॅटो केचप जरुरीप्रमाणे
३ पीटा ब्रेड (शक्यतो whole wheat) किंवा ३ पोळ्या अगर टॉर्टीया

Assembly -
(हे अगदी खाण्याच्या वेळेला करावे)

* वाफवलेल्या मुटक्यांच्या १ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात
* दही, काकडीचा खीस, मीठ, जीरेपूड, साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे
* पीटा ब्रेडला मधे कापुन अर्धा भाग पोकळ करुन त्यात मेथीच्या मुटक्याच्या ३-४ चकत्या घालाव्यात.
* त्याच्या कडेने २-२ काकडीच्या चकत्या, १-१ टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात.
* त्यात थोडे केचप आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर घालावी
* वरुन चिरलेला लेट्युस घालावा आणि सर्व्ह करावे.

काकडीची कोशिंबीर सोबत असेल तर पूर्ण मील होते. उरलेले मुटके पण नुसते खाता येता.

टीप -

* मेथी निवडायला वेळ लागतो तो या रेसीपी मधे धरलेला नाही.
* फ्रोझन मेथीमुळे तो वेळ वाचतो. फ्रोझन मेथी घेताना रूम टेंपरेचरला आल्यावर पिळुन घ्यावी. ते पाणी टाकुन द्यावे.
* काकडीचे पाणी टाकुन न देता मीठ, जिरेपुड घालुन पिण्यास वापरावे.
* मेथीच्या ऐवजी पालक वापरला तरी हरकत नाही.
* पीटा ब्रेड मिळत नसेल तर टॉर्टीया किंवा पोळ्या वापरुन wrap करता येतो. त्यासाठी पोळी पसरुन त्यावर मुटक्याच्या चकत्या टोमॅटो, काकडी, लेट्युस, केचप, कापडीची कोशिंबीर घालुन गुंडाळावी.

सॅलड
१ टोमॅटो - मोठे तुकडे करुन
१ काकडी - मोठे तुकडे करुन
२ वाट्या - लेट्युस मोठा कापुन
२ चमचे ऑलिव्ह ऑईल
१ चमचा लिंबाचा रस
चिमुट्भर मीठ, साखर, मिरीपुड

कृती - लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपुड, तेल एकत्र करुन फोर्क ने १-२ मिनिटे फेटुन ठेवावे.
काकडी, टोमॅटो, लेट्युस एकत्र करुन एका पसरट बाऊल मधे ठेवावे.
वाढण्यापुर्वी त्यावर एकत्र केलेले सॅलड ड्रेसिंग घालुन हलक्या हाताने मिसळावे.

टीप - ह्या सॅलडमधे ढबु मिरची, शिजलेल्या बीटचे तुकडे, खिसलेले गाजर घालता येते.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...