Wednesday, March 26, 2008

दोडक्याची चटणी (Ridge Gourd Chutney)

English Version of this recipe - https://sites.google.com/site/vadanikavalgheta/vadanikavalgheta/ridge-gourd-chutney


घरी लावलेल्या दोडक्याला कधीतरी एखादाच दोडका असेल तर भाजी सगळ्यांना पुरायची नाही. आणि दोडका तसाच वेलावर ठेवला तर एखाद्या दिवसात जून होऊन जायचा. आशावेळी मम्मी दोडक्याची ही चटणी करत असे.

१ मध्यम आकाराचा दोडका
१-२ लसुण पाकळ्या
१-२ टेबल्स्पून खिसलेले कोरडे खोबरे
मुठभर शेंगदाणे
३-४ हिरव्या मिरच्या
१ मुठ कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
एक चमचा तेल

कॄती - दोडका स्वच्छ धुवून १/२ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात. शेंगदाणे आणि खोबरे वेगवेगळे कोरडे भाजुन घ्यावेत. कढईत तेल तापवून त्यात मिरच्या आणि लसुण घालावा. किंचीत परतून त्यावर दोडक्याच्या फोडी घालाव्यात. नीट खरपूस भाजुन घ्यावे. दोडक्याच्या फोडी थोड्या गुलबट दिसु लागतील. त्यात खोबरे, दाणे, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सरमधुन थोडे जाडसर वाटुन घ्यावे.

टीप - १. एखादा दोडक थोडा जून निघतो अशावेळी त्याची साल थोडी तासुन टाकून उरलेल्या दोडक्याची चटणी करता येते.
आवडत असेल तर दही, भाकरी आणि ही चटणी खाऊन पहाण्यास हरकत नाही.

लाल टोमॅटोची भाजी (Red Tomato Curry)

सकाळची भाजी कमी पडणार असेल किंवा पप्पांपुरती असेल तर मग मम्मी आमच्यासाठी ही भाजी करायची. पप्पांना टोमॅटोच्या भाजीत अज्जिबात इंटरेस्ट नसायचा त्यामुळे तेही खूश आणि मला आणि सुबोधला खुप आवडायची म्हणुन आम्ही खूश! पण एक मात्र खरे, ही भाजी मुद्दाम ठरवून केली की अजिबात ती चव येत नाही. पट्कन काहीतरी हवे म्हणुन २ टोमॅटो चिरावेत एखादा पाकळी लसुण ठेचावा आणि करावी तिच चव खरी!
Tomato Bhaji
२ मोठे पिकलेले टोमॅटो
१-२ लसूण पाकळ्या चिरुन
१/२ कांदा (वगळला तरी हरकत नाही)
१ चमचा दाण्याचे कुट
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद
१/२ टीस्पून गोडा मसाला
चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, साखर

कृती - कांदा, टोमॅटो चिरुन घ्यावा. लसुण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेलाची जिरे, मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी घालावी. त्यातच ठेचलेला लसुण घालुन थोडे परतावे. कांदा घालणार असाल तर तो परतुन घ्यावा. वरुन चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, मीठ, साखर आणि गोडा मसाला घालावा. नीट परतावे. टोमॅटो शिजायला खुप वेळ लागत नाही. साधारण ३-४ मिनीटे परतून दाण्याचे कूट घालावे. मिसळून गॅस बंद करावा.

टीप - १. टोमॅटो नीट पिकलेले असतील तर ही भाजी एकदम चविष्ट लागते.
२. मसाले वगैरे न घालता पण ही भाजी मस्त लागते.
३. भाजी थोडी पातळ चालणार असेल तर गॅस बारीक करुन शिजवावी आणि थोडी दाट हवी असेल तर गॅस मोठा करून शिजवावी.

Tuesday, March 25, 2008

दह्यातला साबुदाणा (Yogurt Sabudana)


Tapioca Yogurt


आमच्याकडे घरी कोणाचे रोजचे उपवास कधीच नव्हते. श्रावण सोमवार, अंगारकी, आषाढी, कार्तिकी, महाशिवरात्र हे आमच्यकडे उपवासाचे दिवस. त्यामुळे साबुदाणा खिचडी फार कमी वेळा केली जायची. पण मला खिचडीचे का कोण जाणे फार कौतुक नव्हतेच. त्यापेक्षा मला साबुदाण्याची खीर, गोडाची खिचडी, दह्यातला साबुदाणा हे प्रकार जास्त आवडायचे. त्यातले एक एक प्रकार लिहुन ठेवेन म्हणतेय. आजच्या अंगारकी निमित्त दह्यातला साबुदाणा!

१ वाटी साबुदाणा
२ वाट्या अंबट ताक
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
मीठ, साखर चवीप्रमाणे
फोडणीसाठी १ टीस्पून तेल/तूप, जिरे आणि २ मिरच्या उभ्या चिरुन
थोडीशी कोथिंबीर

कृती - साबुदाणा मंद आचेवर ५-७ मिनीटे भाजुन घ्यावा. भाजताना एकेक दाणा नीट फुलायला हवा पण रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे. एका बाऊलमध्ये अंबट ताक, मीठ, साखर एकत्र करुन त्यात साबुदाणा गरम असतानाच घालावा. बाऊल झाकुन साधारण २-३ तास ठेवुन द्यावे. साबुदाणा नीट मऊ झाला पाहीजे, आत कणी रहाता कामा नये. २-३ तासानी मिश्रण नीट ढवळुन घ्यावे. एखादा साबुदाणा बोटाने चेपुन नीट भिजला आहे ना ते पहावे. तेलाची/तुपाची जिरे मिरची घालुन फोडणि करावी. दाण्यचे कूट, फोडणी साबुदाण्याच्या मिश्रणात मिसळावी वरुन थोडी कोथिंबीर घालुन खाण्यास द्यावे.

टीप - १. खिचडीसाठी भिजवलेल्या साबुदाण्याचा दह्यातला साबुदाणा खुप पाणचट लागतो.
२. soy-yogurt चालत असेल तर ते वापरून याचे Vegan Version करायला हरकत नाही.

Sunday, March 23, 2008

मेथी-मटर-मलाई (Methi Matar Malai)

Methi MaTar Malai
Methi-Matar-Malaai

मलई, दूध, दही वगैरे दुग्धजन्य पदार्थ शक्यतो वापरायचे नाहीत असे मी साधारण ७-८ वर्षांपूर्वी एका सेमिनारला गेले असताना, दुधासाठी, मांसासाठी प्राण्यांचे किती हाल करतात ते पाहिल्यावर ठरवले. त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या पद्धतीमधेदेखील खूप बदल झाले/केले. माझा स्वतःचा 'दूध खूप पौष्टीक असते' वगैरे भाकडकथांवरचा विश्वास उडाला. असेही पनीर वगैरे पंजाबी पदार्थ माझ्या फार आवडीचे नव्हते आणि अजुनही नाहीत. पण मेथी-मटर मलाई मला अतिशय आवडणारा. साधारण ५ वर्षापूर्वी मी ही भाजी एका पॉटलकसाठी केली आणि कोणाचाही विश्वास बसला नाही की त्यात मलई घातलेली नाहीये. त्यानंतर थोडा बदल करुन मी ही भाजी जास्त चविष्ट आणि आरोग्याला चांगली अशी बनवायला सुरुवात केली. संगिताने व्हीगन रेसिपींविषयी विचारले तेव्हाच ठरवले की ही भाजी करुन, फोटो काढुन मगच लिहायची.

१ मोठी जुडी मेथी
१ कप मटार
५-६ काजु
४-५ बदाम
१ मध्यम कांदा
१ मोठा टोमॅटो
१ टीस्पून गरम मसाला
मीठ, लाल मिरची पावडर चवीप्रमाणे
किंचीत साखर
१/२ टीस्पून जिरे, धणे पावडर (प्रत्येकी
फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, हिंग, हळद.

कृती - काजु, बदाम एका वाटीत कोमट पाण्यात भिजत घालावेत. मेथी निवडुन, धुवुन चिरुन घ्यावी. मटर ताजे असतील तर एक कप मोजुन घ्यावेत. फ्रोजन वापरणार असाल तर १/२ तास आधी बाहेर काढुन ठेवावेत. कांदा सोलुन मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावा. कांदा वाटताना त्यात शक्यतो पाणी घालु नये. टोमॅटोदेखील मिक्सरमधुन बारीक वाटुन घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात तेल तापायला ठेवावे. तापले की त्यात जिरे, हिंग आणि हळद घालून फोडणी करुन घ्यावी. त्यात वाटलेला कांदा घालुन परतायला घ्यावा. गॅस शक्यतोवर मध्यम असावा. सतत हलवत राहुन कांदा परतावा. कांदा पूर्णपणे गुलाबी/सोनेरी रंगावर परतला गेला पाहीजे. कांदा पूर्ण परतल्यावर त्यात बारीक केलेला टोमॅटो घालावा. त्यावर मीठ, लाल तिखट, गरम मसाला, जिरे-धणे पावडर. घालून व्यवस्थीत परतून घ्यावे. त्यावर मटर घालुन एखादा मिनिट परतावे. त्यात चिरलेली मेथी घालुन नीट परतून घ्यावे. मेथी आणि मटार शिजण्यासाठी गरज असेल तर भांद्यावर झाकण घालून एक वाफ आणावी. दरम्यान भिजवलेल्या काजु आणि बदामाची एकत्र पेस्ट करावी. एक वाफ आणल्यावर भाजीमधे ती पेस्ट घालुन नीट ढवळावे आणि गॅस बंद करावा.

टीप - १.महत्वाची टीप म्हणजे कांदा नीट भाजला गेला पाहीजे. अर्धवट कच्च्या कांद्याचा वास अतीशय खराब येतो. त्यामुळे कांदा खरपूस भाजला जाणे अतिशय महत्वाचे आहे. १ मध्यम कांदा भाजायला साधारण ५-७ मिनिटे कमीतकमी लागतात.
२. माझ्याकडे गरम मसाला नव्हता म्हणुन मी गोडा मसाला वापरून करुन पाहीले चव अतिशय सुरेख आली तेव्हापासुन मी शक्यतो गोडा मसालाच वापरते.
३. काजु-बदाम कमीतकमी एखादा तास भिजले पाहीजेत. त्यामुळे पेस्ट कणीदार न होता नीट बारीक होते.
४. एकदा लसुण्/आले वाटुन घालुन बघितले पण चव खूप उग्र वाटली म्हणुन आता मी आले/लसुण या भाजीमधे घालत नाही.

Thursday, March 20, 2008

इडली-चटणी-सांबार (Idli chutney Sambar)

Idli Chutneyइडली -
इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या लागतात. पण इथल्या थंडीत पिठ अंबणे थोडे कठीण जात असे म्हणुन मग एकदा इडली रवा आणुन करुन पाहीले. ते पण नीट झाले. त्याच वेळेला थंडीमधे पीठ कसे अंबवावे याची एक 'ट्रिक' पण कळली ती पण इथे देतेय.

३ वाट्या इडली रवा
१ वाटी उडीद डाळ

कृती - डाळ आणि रवा धुवुन वेगवेगळे भिजत घालावे. ६ तासाने डाळ एकदम बारीक वाटावी. डाळ वाटुन होत आली की त्यात रवा घालुन वाटावे. फूडप्रोसेसर असेल तर त्यात घालुन थोडावेळ फिरवावे. पिठ साधारण भजीच्या पिठासरखे असावे. पिठ एका मोठ्या पातेल्यात काडुन त्यात १/२ कांदा घालुन पिठात बुडेल असा ठेवावा. त्यावर झाकण ठेवुन पातेले उबदार जागी ठेवावे. थंडीत साधारण १०-१२ तासात पीठ फुगुन येते. इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमधे ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे.
वर दिलेल्या प्रमाणाअत साधारण ४०-४५ इडल्या होतात.

टीप - पीठ ओव्हनमधे ठेवुन ओव्हनचा दिवा चालू केला तर ६-७ तासात पीठ अंबते.

चटणी -
१ जुडी कोथिंबीर निवडुन
२-३ हिरव्या मिरच्या
१ मुठ शेंगदाणे
१/४ वाटी ओले खोबरे
अर्ध्या लिंबाचा रस
१/२ इंच आल्याचा तुकडा
मीठ, साखर चवीप्रमाणे

कृती - वरील सर्व साहित्य मिक्सरमधे घालुन बारीक वाटावे. गरज लागली तर थोडे पाणी घालावे.

टीप - आवड असेल तर चटणीला हिंग, जिरे, मोहरी, कढिपत्त्याची फोडणी घालावी.

सांबार -
१ वाटी तुरडाळ
१ मोठा टोमॅटो
१ मध्यम कांदा
२-३ टीस्पून सांबार मसाला
मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या

कृती - डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.

टीप - १. सांबारमधे आवडत असेल तर थोडा गुळ घालायला हरकत नाही.
२. सांबारमधे थोडे ओले खोबरे घातले तरी चांगले लागते.

Monday, March 17, 2008

कच्च्या फणसाची भाजी (Raw Jackfruit bhaaji)

कोकणात कच्च्या फणसाची भाजी खुप आवडीने खाल्ली जाते. मामा कोयनेहुन येताना कधितरी छोटे फणस घेउन येत असे. ते फणस साफ करणे म्हणजे जिकिरीचे काम असे. पण भाजी फार अवडत असल्याने ते केले जायचे. विळीला तेल लावुन वरचे टणक साल काढुन टाकायची. मग आतल्या गराचे ६-७ तुकडे करुन कुकर मधे २-३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यायचे. मग त्या शिजवलेल्या तुकड्यातला मधला दांडा काढुन टाकायचा. तो तसा लगेच निघतो. राहिलेले तुकडे बोटाने कुस्करुन त्याची भाजी करावी.

कच्च्या फणसाची भाजी


ही झाली 'फ्रॉम स्क्रॅच' रेसीपी! पण माझ्या सारख्या 'डमीज' साठी सोपी पद्धत आहे ती खालील प्रमाणे -

१ कॅन कोवळा फणस
१ मध्यम कांदा मोठा-मोठा चिरुन
१/४ कप हरबरा डाळ
१-२ लसुण पाकळ्या
१-२ सुक्या मिरच्या
१ टेबल्स्पून खोबरे (ओले/सुके)
१ टेबल्स्पून तेल
चवीपुरते मीठ
१ टीस्पून काळा मसाला
चवीप्रमाणे लाल मिरची पावडर
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग

कृती - डाळ साधारण १-२ तास भिजत घालावी. कॅन फोडुन त्यातला फणस काढुन पाणी फेकुन द्यावे. फणसाचे तुकडे पाण्याने जरा धुवुन घ्यावेत. पाणी न घालता कुकरला २ शिट्ट्या करुन घ्याव्यात. गार झाल्यावर फणस कुस्करुन घ्यावा. कांदा मोठा मोठा चिरुन घ्यावा. लसुण, खोबरे, लाल मिरच्या एकत्र वाटुन घ्यावे. कढईत तेल तापवुन नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात कांदा गुलबट रंगावर भाजुन घ्यावा. त्यात भिजवलेली डाळ घालुन परतुन घ्यावी. डाळ अर्धवट शिजेल इतके परतावे. गरज लागेल तसा पाण्याचा हबका मारावा. त्यात मीठ, काळा मसाला, लाल तिखट घालावी. वरुन फणास घालुन नीट परतुन घ्यावे. मंद आच करुन कढईवर झाकण घालुन एक वाफ आणावी. चपातीबरोबर गरम गरम खावी.

टीप - १. कोवळ्या फणासाचे टीन देसी स्टोर मधे आणि चायनीज मार्केट मधे मिळतात.
२. फणस धुवुन मगच शिजवावा. त्यातले पाणी निघुन गेलेच पाहीजे.
३. हरबरा डाळीऐवजी काळे हरबरे भिजवुन कुकरला शिजवुन घातले तरी अतिशय चविष्ट लागते.

Monday, March 10, 2008

अननसाची भाजी (Pineapple Bhaaji)

भुवया उंचावल्या ना? गोडसर चवीच्या भाज्या आवडत असतील तर हा प्रकार करुन पहा.

२ कप अननस (मध्यम आकाराच्या फोडी करुन)
२-३ लाल सुक्या मिरच्या
३-४ टेबल्स्पून ओले खोबरे
चवीप्रमाणे मीठ व किंचीत साखर
फोडणीसाठी थोडे तेल, जिरे आणि मोहरी

कृती - पातेल्यात तेल गरम करुन जिरे मोहरीची फोडणी करुन घ्यावी. त्यावर लाल मिरच्या घालुन किन्चीत गरम कराव्यात त्यावर अननस घालावा. ओले खोबरे थोडे भरड वाटुन त्यावर घालावे. मीठ व साखर घालुन एकदा हलवावे आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. हवी असेल तर वरून कोथिंबीर घालायला हरकत नाही.

टीप - मी शक्यतो ताज्या अननसाच्या फोडी वापरते. पण कॅनमधला वापरायचा असेल तर Packed in its own juice अशा प्रकारचा कॅन आणुन रस काढुन फोडी वापराव्यात.

रेड चार्डची भाजी (Red Chard (Maharashtrian style))


Red Chard


माठ, तांदळी, राजगिरा या भाज्या अमेरीकेमध्ये आल्यावर खायला मिळेनाश्या झाल्या आणि मग त्यांना पर्याय शोधणे आले. तेव्हा इथे रेड चार्ड नावाची भाजी मिळते हे समजले आणि एकदा तो *मोदळा घरी आणुन त्यावर प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग यशस्वी झाला तो हा -

Ready Bhaji

१ जुडी रेड चार्ड
३-४ लसुण पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या (चवी प्रमाणे कमी जास्त किंवा पूर्णपणे वगळल्यास हरकत नाही)
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी आणि हळद

कृती - चार्ड आणुन स्वच्छ धुवुन घ्यावा. या भाजीला प्रचंड रेती चिकटलेली असल्याने नीट धुवुन घ्यावी लागते. दांडे जून असतील तर टाकुन द्यावेत कोवळे असतील तर बाजूला काढुन ठेवावेत. आता भाजी मध्यम कापून घ्यावी. ही पाने खूप लांब आणि रुंद असतात त्यामुळे उभी आडवी दोन्ही बाजुने कापावीत. कोवळे देठ बारीक कापुन घ्यावेत. लसूण ठेचुन घ्यावा. एका कढईत तेल तापवून नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात ठेचलेला लसुण घालावा. मिरची घालणार असाल तर उभी चिरुन घालावी. त्यावर चिरलेल्या भाजीपैकी अर्धी भाजी घालुन त्यावर थोडे मीठ घालावे. त्यवर उरलेली भाजी घालावी. गॅस बारीक करुन झाकण ठेवावे. २-३ मिनीटामध्ये भाजी वाफेने खाली बसेल तेव्हा परतावी. नीट परतून घेऊन शिजली की भाकरीबरोबर अथवा चपातीबरोबर गरम गरम खावी.

टीप - १. लसूण खिसुन अथवा कापून न घेता शक्यतोवर ठेचुन घ्यावा.
२. या भाजीला तेल कमी लागते. भाजीला सुटणा-या पाण्यात ती नीट शिजते.

* मोदळा - गावाकडे भाजीच्या किंवा गवताच्या मोठ्या पेंडीला मोदळा म्हणतात.

गोडाचे लिंबू लोणचे (Sweet Lemon/Lime Pickle)


Sweet Lemon Pickleचटण्या-लोणची प्रकरणे माझ्या फारशी आवडीची नाहीत. अलीकडे मैत्रीणीला हवे होते म्हणुन केले थोडे आणि विचार केला लिहुन ठेवावी पाककृती.

७ रसरशीत पिवळी लिंबे
३/४ कप साखर
१/२ चमचा लाल तिखट
३ टेबल्स्पून मीठ

कृती - सर्व लिंबे धुवुन स्वच्छ कोरडी करुन घ्यावीत. ५ लिंबांच्या, एका लिंबाच्या साधारण ८-१० अशा प्रमाणात फोडी कराव्यात. २ लिंबाचा रस काढुन घ्यावा. एका जाडबुडाच्या स्टीलच्या पातेल्यात लिंबाच्या फोडी, साखर, मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस असे एकत्र करुन नीट हलवून साधारण अर्धा एक तास तसेच ठेवून द्यावे. तासाभरानंतर पातेले गॅसवर ठेवुन मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. साखर विरघळून पाकाला एक उकळी आली की पातेले उचलून बाजुला ठेवावे. झाकण झाकू नये. पूर्णपणे थंड झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावे. रस लगेच खाता येतो. पण फोडी मुरायला साधारण ५-६ दिवस लागतात.

टीप -
१. अमेरीकेमध्ये मेयर लेमन नावाची खुप रसदार आणि केशरट लिंबू मिळतात त्याचे लोणाचे अप्रतीम होते.
२. हिरवे लिंबाचे लोणचे पण चांगले लागते पण मुरायला थोडा वेळ लागतो.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...