Tuesday, April 29, 2008

भाताचे थालीपीठ (Rice Thalipeeth)

घरी कोणाला जेवायला बोलावले तर पांढरा भात केला जातो. आणि तो शिल्लक राहीला तर खाणे माझ्या जिवावर येते. परवा अचानक असे झाले तेव्हा मला माझ्या एका दूरच्या मावशीने शिकवलेले भाताचे थालीपीठ आठवले आणि लगेचच करुन पाहीले.

Rice Thalipeeth

उरलेला शिळा भात
हिरव्या मिरच्या
थोडेसे जिरे
तांदळाचे पीठ
मीठ
थोडीशी कोणतीही पालेभाजी चिरुन

कृती - जिरे आणि मिरच्या मिक्सरमधेबारीक करुन घ्याव्यात. शिळा भात थोडे पाणी शिंपडुन मळुन घ्यावा. त्यात वाटलेली मिरची, चिरलेली पालेभाजी मीठ घालुन नीट एकत्र करावे. त्यात लागेल तसे तांदळाचे पीठ घालावे. थोडे थोडे पीठ घालुन थालीपिठाच्या पिठाप्रमाणे गोळ होईल इतकेच पीठ घालावे. गॅसवर तवा तापायला ठेवावा. पोळपाटावर एक पेपर नॅपकीन किंवा स्वच्छ पंचा ठेवुन त्याला पंचाला थोडे पाणी लावुन घ्यावे. त्यावर बनवलेल्या पिठाचा गोळा ठेवून तो किंचीत पाणी लावून थालीपिठाप्रमाणे थापावा. थापून झाल्यावर थालीपिठाला एखादेतरी छिद्र पाडावे. ते थालीपीठ गरम तव्यावर पंच्याने उचलून उलटे टाकावे आणि वरून पंचा हळुहळु सोडवुन घ्यावा. थोडेसे तेल टाकून थालीपीठ मंद आचेवर दोन्हीकडुन नीट भाजुन घ्यावे.
गरम गरम असतानाच केचप किंवा चटणीबरोबर खायला द्यावे.

टीप - १. उरलेला भात शक्यतो फ्रीझमधे न ठेवता थालीपिठासाठी वापरावा.
२. तांदळाचे पीठ नसेल तर बेस, मैदा, गव्हाचे पीठ यापैकी कोणतेही पीठ वापरले तरी हरकत नाही.
३. कोणतीही पालेभाजी नसेल तर कोथिंबीर, शिजवलेली कोरडी पालेभाजी, कसुरी मेथी यापैकी जे असेल ते घातले तरी चालते.

Monday, April 21, 2008

कढीपत्त्याची चटणी (Kadhipatta Chutney)

कराडला आमच्याकडे कढीपत्त्याचे खूप मोठे झाड आहे. एका वादळात त्याची फांदी तुटली आणि खूप लोकाना कढीपत्ता वाटून टाकुन देखील बरीच पाने शिल्लक राहीली. त्यावेळी मम्मीने प्रथम ही चटणी केली. तेव्हापाशुन माझ्या अतिशय आवडीची झाली.

Kadhipatta Chutney

१ कप कढीपत्ता
१ कप फुटाण्याची डाळ
१/२ कप भाजलेले शेंगदाणे
१/२ टीस्पून तेल
१ टेबलस्पून साखर
चवीप्रमाणे मीठ
१ चमचा लाल तिखट (चवीप्रमाणे कमी जास्त करावे)

कृती - डाळे निवडून घ्यावेत. दाणे भाजुन साले काढुन घ्यावीत. कढिपत्त्याची पाने धुवुन थोडी सुकवून घ्यावीत. पाने एका कढईत घालुन त्यावर तेल घालुन कुरकुरीत होईपर्यन्त भाजुन घ्यावे. डाळे, दाणे, कढीपत्ता, मीठ, साखर एकत्र करुन बारीक करुन घ्यावे.

टीप - १. दाणे, डाळे यांचे प्रमा आवडीप्रमाणे कमी जास्त करण्यास हरकत नाही.
२. आवडत असेल तर २-३ आमसुले घातली तरी चटणी चवीला अप्रतीम लागते.
३. ब्रेड वर तेल आणि ही चटणी खूप छान लागते.
४. इडली, डोश्याबरोबर पण ही चटणी छान लागते.

Thursday, April 17, 2008

श्रीखंड (Shrikhand)

(Link to English Recipe)
भारतात श्रीखंड करणे तितकेसे अवघड नाही असे मला वाटते कारण चक्का तयार मिळतो, बरेच ठिकाणी श्रीखंड पण तयार मिळते. त्यामुळे कमी कष्टात श्रीखंड तयार होउ शकते.

अमेरीकेत आल्यावर इतक्या प्रकारचे दह्याचे डब्बे, १%, २%, whole Milk चे असे प्रकार पाहुन मला जरा(अगदी जराच:D) बावचळ्यासरखे झाले होते. त्यातुनही प्रयोगातुन विज्ञान सारखे श्रीखंड केले. पहिल्यांदा केले तेव्हा दही वगैरे घरी आणले आणि मग लक्शात आले की पंचा वगैरे काहीही नाहिये घरी आणि कुठे टांगायचे हाही एक मोठाच प्रश्न. ताबडतोब काकुला फोन केला काय करु? तिने सांगितलेली ट्रिक वापरून तेव्हा चक्का केला देखील. त्यानंतर मी माझी eco-friendly पद्धत शोधुन काढली ती अशी -

Shrikhand


(खालील प्रमाण साधारण ६ माणसांसाठी आहे)

चक्का -
२ Organic fat Free or 1% milk Fat दह्याचे ३२ औंसचे डबे
एक मोठी भाजी धुवायची चाळणी खालील लिंकमधे आहे त्या पद्धतीची.
चाळणी
१ पंचा (पंचा नसेल तर ५ पेपर टॉवेल)

चाळणीत ४ पेपर टॉवेल लावून ठेवावेत आणि त्यात दही ओतून त्यावर १ पेपर टॉवेल झाकून ठेवावा. ते सगळे एका मोठ्या भांड्यावर ठेवावे. हे सगळे रात्री करुन ठेवल्यास सकाळपर्यंत नीट चक्का होतो.

श्रीखंड -

८ टेबलस्पून साखर
४-५ बदाम
१०-१२ पिस्ते
३-४ वेलदोडे
५-६ केशरकाड्या
१ चिमुट जायफळ पूड

कृती - केलेला चक्का चाळणीमधुन काढुन घ्यावा. त्यात झालेल्या गुठळ्या काढण्यासाठी पीठ चाळायच्या चाळणीमधुन किंवा फ़ूड्प्रोसेसर मधुन काढुन घ्यावा. जायफ़ळ, वेलदोडे आणि केशर एकत्र करुन त्याची पूड करुन घ्यावी. बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करुन घ्यावेत. गुठळ्या काढलेल्या चक्क्यात बदाम-पिस्त्याचे काप, वेलदोड्याची पूड आणि साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे. झालेले श्रीखंड एखादा तास फ़्रिजमधे ठेवावे. बाहेर काढुन परत एकदा नीट एकत्र करावे त्याने केशराचा रंग सगळीकडे नीट पसरेल.

टीप - १. दही शक्यतो Organic वापरा त्याला आंबटपणा चांगला असतो.
२. १ डबा १% आणि एक fat free वापरला तरी हरकत नाही.
३. Non Eco Friendly पद्धतीमधे ५-६ दिवसाच्या वर्तमानपत्रे एकवर एक नीट ठेवुन त्यावर पंचा किंवा पेपर टॉवेल घालुन त्यावर दही पसरावे आणि फक्त २ तासच ठेवावे. जास्ती ठेवले तर चक्का खूप घट्ट होतो. ही वापरलेली वर्तमानपत्रे थोडी वाळवून नेहेमीप्रमाणे recyle करावीत.
४. बर्याच दिवसापूर्वी सोया दह्याचे श्रीखंड केले होते. ते पण चवीला छानच झालेले.

Thursday, April 10, 2008

अननसाची कोशिंबीर (Pineapple Salad)

गेल्या वर्षी १५ दिवस कामासाठी मेक्सिकोला रहाणाचा योग आला. तिथे असताना रस्त्याच्या बाजुला फळांचे बोटाएवढे तुकडे कपमधे घालुन ठेवलेले असत आणि आपण जेव्हा विकत घेऊ तेव्हा त्यात आवडीप्रमणे तिखटाची पेस्ट, मीठ घालुन देत असत. ते गोड फळांवर तिखट घालुन खाणे कसेतरी वाटले होते. पण त्याची चटक लागली माझी बरीच जेवणे त्यावरच झाली. परत आल्यवर त्यात थोडा बदल करुन तयार झालेली ही कोशिंबीर.

Pineapple Salad

१.५ कप आननसाचे लहान तुकडे
१ टेबलस्पून ओले खोबरे
२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
किंचीत साखर, चवीप्रमाणे मीठ
१/२ टीस्पून लाल तिखट

कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करुन वाढावे.

टीप - १. अननस शक्यतो ताजा घ्यावा.
२. कॅनमधला अननस त्यात घातलेल्या ज्युसमुळे खूप गोडसर असतो, त्यामुळे तो वापरवा लागलाच तर साखर नाही घातली तरी चालेल.
३. थोडे दाण्याचे कुट घातले तर मधुन मधुन मस्त क्रंची लागते.

हिरव्या सफरचंदाची कोशिंबीर (Granny Smith Apple Salad)

मागे एकदा माझी मैत्रीण प्रियाने मला सफरचंदाचे रायते कसे करायचे ते सांगितले होते. दही /दूध खूप खात नाही म्हणुन मी त्यात थोडा बदल केला आणि झालेली कोशिंबीर खालीलप्रमाणे -

Granny Smith Apple Salad

१ हिरवे सफरचंद (Granny Smith प्रकारचे)
१ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट
१ टेबलस्पून कोथिंबीर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून लिंबाचा रस
किंचित साखर

कृती - सफरचंद धुवुन चार फोडी करुन बिया काढुन टाकुन टाकाव्यात. त्या फोडी मोठा खिसणीने खिसुन घ्याव्यात. खिसलेल्या सफरचंदाला लिंबाचा रस लावावा. वरुन मीठ, साखर, दाण्याचे कूट, कोथिंबीर एकत्र करुन वाढावे.

टीप - १. लिंबाचा रस सफरचंदाला लावायाला विसरु नका.
२. लिंबाच्या रसाच्या ऐवजी अर्ध्या संत्र्याचा रस घातला तर स्वाद चांगला येतो.

Saturday, April 05, 2008

एक वर्ष पूर्ण होताना ...

आज गुढीपाडवा! गेल्यावर्षी गुढीपाडव्याला ह्या ब्लॉगची सुरुवात केली. सुरुवात करताना माझ्या मैत्रीणींसाठी मी केलेल्या आणि त्यांना आवडणा-या पदार्थांचे एकत्रीकरण एवढाच हेतू होता. पुढे माझ्या लक्षात आले की मी करते त्या पदार्थांमधे तेल, तिखट, कमी प्रमाणात असते. पदार्थ कमी वेळात, आरोग्याच्या दृष्टीने कसा करावा हा हेतू सुरुवातीला नसला तरी साधारण १० एक रेसिपी लिहिल्यावर ते तसे लिहावे असे वाटायला लागले आणि तशा रेसिपीज लिहायला सुरुवात केली. माझ्या स्वयंपाकावर माझी मम्मी, आज्जी, काकू मैत्रीणी, माझा भाऊ अशा ब-याच जणांचे संस्कार आहेत. काही काही रेसिपीज मी स्वत: शोध लावुन केलेल्या आहेत तर काही कोणाच्या रेसिपीज थोडा फर फ़रक करुन मी वापरल्या आहेत. योग्य त्या व्यक्तीला योग्य ते श्रेय मी दिलेले आहेच.

अलीकडे संगीताने Vegan Recipes लिहीशील का किंवा लगेल तसा सल्ला देशील का असे विचारले तेव्हा माझ्या लिहिण्याला अजुन एक दिशा मिळली. दूध आणि दुधापासुन तयार होणा-या पदार्थांमुळे कोणते दुष्परीणाम होतात ते माहीती असल्यामुळे मी मला ते करायला काहीही कठीण वाटले नाही. त्यानंतर मी दूध, दह्यापासुन केलेले पदार्थ लिहिणार नाही असे मुळीच नाही. माझ्या स्वत:च्या रोजच्या आहारात दूध, दही फार वापरत नसल्याने त्या प्रकारच्या पदार्थांचे प्रमाण कमी असेल.

तूप, दही, दूध, चीज वगैरे दुग्धजन्य पदार्थ शरीराला हानीकारक असतात. त्याचप्रमाणे साखर, अती तेलकट, मैद्याच्या पदार्थांमुळेही शरीराची हानी होते. प्रत्येकाने खाण्याच्या बाबतीत थोडीफार खबरदारी घेतल्यास रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासरखे विकार अटोक्यात रहातात. याबाबतीत माझा अभ्यास अतिशय तोकड असल्याने ए तिथेच थांबवते. मी कोणाती पुस्तके, वेब-साईटस वगैरे वापरते ते हवे असेल तर ती माहीती मात्र अवश्य देऊ शकते.

मी मधे ४ वर्षे कोणतेही शिजवलेले अन्न खात नव्हते. त्याकाळात माझे स्वयंपाकाचे प्रयोग खुप बदलले. ते पदर्थ देखील इथे देण्याचा मी प्रयत्न करेन. नवीन पोस्ट मधे जमेल तसे फोटो टाकण्याचे ठरवले आहे. तो निश्चय किती टिकतो ते काळच ठरवेल. मनात बरेच काही करायचे आहे. वेळ कमी आणि सोंगे जास्त अशी माझी स्थिती असल्याने कधीतरी मधे एकही पदार्थ न लिहिण्याची शक्यता आहे.

तुम्हा सर्वाना गुढीपाडव्याच्या असंख शुभेच्छा! नवीन वर्ष तुम्हा सर्वाना आरोग्यवर्धक जावो.

आळुची वडी (Alu Vadi - Savory Taro Patties)

Savory Taro Patties


माझ्या आजोळी आळुची झुडुपे खूप होती. त्यामुळे लहानपणापासुन आळुच्या पानाचे बन बघायची सवय. भारतात असताना कधी आळुची पाने विकत आणायची गरजच वाटली नाही. एकदा पाने काढली की मोठ्या पानाच्या वड्या आणि लहान पानांची भाजी लागोपाठ घरी होत असे. परदेशी रहायला आल्यावर घरच्या सगळ्या गोष्टी फार आठवायला लागतात. अशाच एकावेळी मला देसी दुकानात आळुवडीचा टिन मिळाला तो आणुन त्याच्यावर आवश्यक ते सोपस्कार करुन लग्गेच त्याचा फ़डशा पाडला. त्याची चव खुप ग्रेट वगैरे अजिबातच नव्हती पण वेळेला मिळाले. त्यानंतर कधीतरी फ्रोझन आळुवडीचा शोध लागला पण त्यातल्या तेलामुळे त्यापासुन दुरच राहु लागले. दरम्यान कधितरी चायनीज दुकानात गेले तेव्हा आळुची पाने मिळाली मग तेव्हापासुन ते चित्र-विचित्र वास सहन करत आळुची पाने आणि फणसाचे गरे आणण्यासाठी त्या दुकानात जात असे. आजकाल १-२ देसी दुकानात आळुची पाने नेहेमी मिळतात त्यामुळे वडी, भाजी करणे सोपे झाले आहे. अलिकडे केलेल्या वडीचे फोटो खाली पहाआळुची वडी करण्याच्या स्टेप्स


६ मोठी आळुची पाने
९ टेबल्स्पून बेसन
१ टीस्पून लाल मिरची पावडर
१ टीस्पून गोडा मसाला
किंचीत हळद
लहान लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ, गूळ
मुठभर कोथिंबीर
१ टीस्पून धणे पावडर
पीठ भिजवण्यासाठी पाणी

वड्या वाफवण्यासाठी पाणी, शॅलोफ्राय साठी तेल.

कृती - आळुच्या पानाचे देठ काढुन मागच्या बाजुने शिरा थोड्या तासुन घ्याव्यात. पाने पाण्याच्या बारीक धारेखाली धरुन धुवावीत आणि फडक्याने कोरडी करावीत. एका बाऊलमधे बेसन, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, मसाला, हळद, कोथिंबीर, धणे पावडर, गूळ एकत्र करुन भजीच्या पिठाइतपत सैल भिजवून घ्यावे.
एका मोठ्या भाड़्यात (ज्यावर चाळण बसु शकेल असे) पाणी तापत ठेवावे. चाळणीला तेलाचे बोट पुसुन घ्यावे.
पोळपाट किंवा कटिंग बोर्ड वर सगळ्यात मोठे पान उलटे (शिरा वरच्या बाजुला दिसतील असे ) ठेवावे. भिजवलेल्या बेसनाचा अगदी पातळ थर सगळीकडुन सारखा बसेल असा त्या पानाला लावावा. तो लावून झाल्यावर त्या पानाएवढे किंवा त्याहुन थोडे लहान पान त्या थरावर ठेवावे. त्याला देखील पीठाचा थर लावावा. असेच तिसरे पान लावून पीठ लावावे. आता पानाचा शेंडा दुमडुन आणुन मुख्य पानावर चिटकवावा. तसेच कडेने पण १-१ इंच पाने आतल्या बाजुने दुमडावीत. पानाची वरची २ टोके ताच प्रमाणे चिटकवावीत. आता पानाचा आकार साधरण आयताकृती दिसू लागेल. त्या आयताची सुरळी करायला घ्यावी हलक्या हाताने दुमडत जाउन सुरळी करावी. उरलेल्या ३ पानाची पण अशीच सुरळी करुन घ्यावी. दोन्ही सुरळ्या चाळणीत ठेवुन त्यवर झाकण ठेवावे. ग.एस मोठा करून १०-१२ मिनीटे वाफ येऊ द्यावी.


Taro Roll (uncooked)

वाफवलेल्या वड्या थोड्या थंड झाल्या की सुरळिच्या अर्धा इंच जाडीच्या चकत्या कराव्यात. एका तव्यावर चकत्या पूर्ण पसरून मंद आचेवर थोडे थोडे तेल घालुन खरपूस भाजुन घ्यावात.
Patties ready for frying

टीप - १. मी एका मोठ्या आळुच्या पानाला दीड चमचा बेसन असे प्रमाण घेते. पानाच्या आकारावरुन बेसन कमी जास्त करावे.
२. अळु घेताना नेहेमी काळ्या दांड्याचा घ्यावा, कमी खाजरा असतो. आळुचा खाजरेपणा कमी करण्यासाठी चिंच घालणे आवश्यक आहे.
३. आळुची पाने साफ़ करताना हाताला आणि कपड्याना काळे डाग (न निघणारे) पडण्याची शक्यता असते. नुकतीच तोडलेली पाने काळजीपूर्वक हाताळावीत.

स्वयंपाकासाठी कोणत्या प्रकारची भांडी वापरावीत? (Cookware Etc.)

१. काचेची भांडी जी मायक्रोवेव सेफ़ असतात तीच फ़क्त मायक्रोवेव मधे वापरता येतात.
२. बोरोसील नावाच्या कंपनीने मधे काचेचे चहा करायचे भांडे बाजारात आणले आहे ते उत्तम आहे. त्यात वेगवेगळे साईझेस पण मिळतात. पण भांडे नुसते तापवू नये, थंड फ़रशीवर वगैरे ठेवु नये या सुचना नीट पाळाव्या लागतात.
२. बेकिंग करत असाल तर US मधे पायरेक्स आणि भारतात बोरोसील वापरायला चांगलि असतात.
४. रोजच्या गॅसवर ठेवुन करण्याच्या स्वयंपाकासाठी, US मधे कॉर्निन्ग्वेअर नावाच्या कंपनीची काचेची भांडी पूर्वी मिळत असत आता मिळत नाहीत.
५. रोजच्या पोळ्या भाजायला लोखंडाचा तवा वापरायला हरकत नसावी. तो US मधे 'caste iron griddle' या नावाने मिळतो. त्यातच कधितरी पालेभाजी वगैरे केली आणि केल्या केल्या दुसर्‍या भांड्यात काढुन ठेवली तर रोजही करायला हरकत नाही. भारतत बीडचे तवे आणी कढया अजुनही मिळतत .
६. अल्युमिनिअमच्या भांड्यात पदार्थ फ़ार्वेळ ठेवला तर त्याची पण प्रक्रिया होते म्हणुन ओले पदार्थ जसे भाजी, आमटी वगैरे अल्युमिनिअमच्य भांड्यात करु नयेत. चिवडा वगैरे करायला हरकत नसावी.
७. तांबे, पितळ वगैरेची भांडी कितीही 'उष्णतेचे वाहक' असली तरी आत्ताच्या जमान्यात ती वापरणे शक्य नाही तेव्हा त्याचा विचार करण्याची गरज नाही. William Sonoma सारखी दुकाने आतुन स्टील आणि बाहेरुन तांबे लावलेली भांडी जवळ्पास $६०-$७५ ला २ कप आकाराचे एक भांडे विकतात. त्याचा खरोखर किति उपयोग होतो ते मला माहीती नाही.
८. La Creuset नावाच्या कंपनीची लोखंदाची वरून एनामल लावलेली उत्क्रुष्ठ भांडी मेसीज, William sonomaa वगैरे दुकानात मिळतात. पण ती वजनाने खूप जड आणि महाग असतात. पण त्यात पदार्थ चांगले होतात असे ऐकले आहे. स्वत:चा अनुभव नाही.
९. स्टीलची copper bottom वाली देशातली भांडी जर तळ सपाट असेल तर US मधे पण चालतात. पण गोल असेल आणि घरी flat गॅस असेल तर पदार्थ शिजायला त्रास होतो. पण आच खुप प्रखर असु नये.
१०. analon, circulon, calphalon वगैरे हार्ड अनोडाईझ्ड भांडी नीट लाकडी चमचे उलातणी वगैरे वापरली तरी १० वर्षे वगैरे नीट रहातात. भांडे सगळीकडुन नीट तापते, मौ स्पंजने घासले तरी नीट साफ़ होते आणि पदार्थ जळला असेल तर जरा जरा पाणी घालुन थोडासा भांडी घासायचा साबण घालून उकळले तर नीट निघते.
११. US मधे मिळणारी fabreware, beligue, calphalon वगैरे कंपनीची स्टीलची heavy bottom ची भांडी मिळतात त्यात पण लाकडाचे चमचे वगैरे वापरले तर त्यावर चरे उमटत नाहीत. आणि घासायला पण खूप त्रास होत नाहीत. पण स्टील असल्याने थोड्या दिवसांनी त्याची चकाकी कमी होत जातेच. तळ खूप जड असेल, beligue, calphalon सारखी भांडी, तर भांडे तापायला वेळ लागतो आणी तापलेले भांडे गार होण्यासही वेळ लागतो त्यामुळे ते तंत्र थोडे जमावे लागते.
१२. भारतात आता hawkins futura ची बरीचशी भांडी मस्त मिळतात. तळ सपाट असतील तर US मधे पण वापरायला हरकत नाही.
१४. प्रेशर कुकरमध्ये डाररेक्ट पदार्थ शिजवायचा असेल तर शक्यतो स्टील, futura वापरलेला बरा.
१५. भारतात दूध, दही यासाठी वेगळी भांडी लागतत त्यासाठी साधी स्टीलची भांडी वापरायला हरकत नाही.
१६. मातीची भांडी पुर्वी सर्रास वापरली जात असत. म्हणुन मी माझ्या pottery teacher ला करायचे आहे म्हणुन सांगितले . तेव्हा तिने दिलेले उत्तर खालिल प्रमाणे -

In old day, the clay used in making the pots was natural clay. No one added any chemicals in the clay. So it was good to use. Now a days in the modern pottery, the clay is half natural and half chemicals so I wouldn't suggest to make any pots without glazes to cook food directly.
The food particles can go in the porous surface and might not get cleaned at all and might be home for lot of bacterias. There is a French company who make these kind of pots and might be available in high end shops.
If the Indian cooks still use these earthen pots to make some dishes, I am not sure how hygienic it is and what kind of clay is used. I have not seen them so I can't comment.

मला वाटते गेले ५० एक वर्षे pottery करणा-या, त्यावर research करणार्-या व्यक्तीचे मत थोडे तरी ग्राह्य मानायला हवेच.

Thursday, April 03, 2008

दाणे लावून हिरव्या टोमॅटोची भाजी (Green Tomato Curry with Peanuts)

(Link to English recipe)

मला आणि माझ्या मैत्रीणीला माझ्या (त्यावेळच्या) होणा-या नवा-याने जेवायला बोलावले होते. त्याच्या स्वयंपाक कौशल्याबद्दल मला फार शंका नव्हती पण तिला होती. त्यामुळे घरून जाताना ती नीट चिवडा लाडू वगैरे खाउन निघाली. त्याने आमच्यासाठी दहीभात, ही भाजी, विकतच्या पोळ्या, पापडाचा खुळा, आणि बरेच काय काय केले होते. तिला बघुनच धक्का बसला! अशी झाली माझी आणि या भाजीची ओळख. पुढे लग्न झाल्यावर सासरी गेले तेव्हा सासुबाईनी आम्हाला ही भाजी करून घातली. सढळ हाताने तेल, दाणे घालून केलेली भाजी अप्रतीम लागत होती. आई लोकानी केलेल्या सगळ्याच गोष्टीना एक खास चव असते असे माझे प्रामाणीक मत आहे. आपण कितिही प्रयत्न केला तरी अगदी तशीच चव येत नाही. मी नंतर नव-्याकडून ही भाजी करायला शिकले. आता जरा बरी जमते (असे नवराच म्हणतो, मी नाही!).

Green Tomato BhajI
2-3 मध्यम आकाराचे हिरवे टोमॅटो
1/3 कप तुरीची डाळ
3-4 हिरव्या मिरच्या
2-3 लसूण पाकळ्या
1 टीस्पून धणे पावडर
1 टेबलस्पून गरम मसाला
1/2 कप कोथिंबीर
3-4 टेबलस्पून शेंगदाणे
चवीप्रमाणे मीठ
फोडणीसाठी 2 टीस्पून तेल, जिरे, मोहरी आणि हळद
२-३ कप (किंवाभाजी सरसरीत होण्यासाठी लागेल इतके) पाणी.

कृती - डाळ धुवून घ्यावी. टोमॅटोच्या फोडी करून धुतलेल्या डाळीत घालाव्यात. 1 कप पाणी घालून डाळ आणि टोमॅटो कुकरला 2 शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. शेंगदाणे एका कढईत घालून भाजायला ठेवावेत. ते नीट भाजले गेले की काढून मिरच्या भाजून घ्याव्यात. मिरच्या, शेंगदाणे, लसुण, गरम मसाला, धणेपावडर आणि अर्धी कोथिंबीर मिकसरमधून बारीक वाटून घ्यावे. वाटण करताना अगदी थोडे पाणी घालावे. आता एका जाड बुडच्या पातेल्यात तेल तापायला ठेवावे. तेल तापले की जिरे, मोहरी , हळद घालून नीट फोडणी करावी. त्यात वाटलेला मसाला घालून परतायला घ्यावा. मंद आचेवर साधारण 4-5 मिनीटे मसाला हलवत राहावा. नीट परतला गेला की कुकरमधे शिजलेले डाळ-टोमॅटो त्यात घालावे. साधारण एक कप पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण ढवळावे. एक उकळी आणावी. थोडे सरसरीत हवे असेल तर उकळण्यापुर्वीच लागेल इतके पाणी घालावे. वरुन कोथिंबीर घालून भात, भाकरी, पोळी बरोबर गरम गरम वाढावे.

टीप - 1. टोमॅटो घेताना नीट मोठे रसदार बघून घ्यावेत.
2. ही भाजी थोडी तिखट केली तरच छान लागते.
3. यात गुळ, साखर वगैरे अजीबत घालू नये.
4. ही भाजी रसभाजीसारखी सरसरीत असावी खूप दाट किंवा आमटीसारखी पातळही नसावी.

Tuesday, April 01, 2008

हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney)

कराडच्या घरी अम्हाला रहायला जाऊन प्रवाच्या Good Friday ला २४ वर्षे पूर्ण झाली. पण त्या आठवणी अजुनही मनात ताज्या आहेत. तिथे रहायला गेलो तेव्हा मागे मस्त भुस्भुशीत काळी माती होती कारण शेतज्मीन Non-Agricultural करुन घेउन सोसायटी झालेली आमची. त्या जमीनीत त्याकाळी काय टाकाल ते उगवत असे. अशात एकदा खराब झालेला टोमॅटो मागे कचर्याच्या बादलीत ठेवला होता. तो आमच्या राजाने (म्हणजे अमच्या शिकारी कुत्र्याने) खेळत मागे कुठेतरी टाकला. वळवाच्या पावसात त्यतले बी रुजले आणि बरीचशी झाडे उगवली. आणि जवळपास दोनशे वगैरे टोमॅटो त्या १०-१२ झाडाना लागले. घरात त्यावेळी अनेक टोमॅटो सप्ताह साजरे झाले! त्यावेळी खल्लेली घरच्या हिरव्या टोमॅटोची चटणी अजुनही आठवते.


Green tomato Chutney

२ मध्यम हिरवे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी-जास्त करण्यास हरकत नाही)
२ टेबलस्पून भाजलेले तीळ
२ टेबल्स्पून भाजलेले शेंगदाणे
२ टेबलस्पून भाजलेले सुके खोबरे
१-२ लसुण पाकळ्या (आवडत असतील तर)
मुठभर कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ, गूळ
१ टीस्पून तेल, थोडे जिरे आणि हळद

कृती - टोमॅटो स्वच्छ धुवुन उभे पातळ कापून घ्यावेत. एका कढईत तेल तापवून त्यात जिरे आणि हळद घालावी. जीरे थोडे तडतडले की त्यात टोमॅटो घालून परतावे. सतत हलवत रहावे. तोंएटोला सुटलेले पाणी पूर्ण आटले पाहीजे आणि टोमॅटो नीट शिजेल अशे भाजले गेले पाहीजे. कदाचीत काही फोडी करपण्याची शक्यता आहे. तसे झाले तरी हरकत नाही. आता हे भाजलेले टोमॅटो थोडे नीवू द्यावेत. मीठ, मिरची, तीळ, दाणे, खोबरे, कोथिंबीर आणि गूळ एकत्र करुन भरड वाटावे. आता त्यातच टोमॅटो घालून नीट बारीक करून घ्यावे.

टीप - १. शेंगदाणे, तीळ आणि खोबरे वेगवेगळे भाजुन घ्यावे.
२. नुसत्या तिळाची चव आवडत असेल तर दाणे आणि खोबरे न घालता फक्त तीळ घालून ही चटणी करून पहावी.
३. इथे दिलेल्या पद्धतीने चटणी केली तर थोडी सरसरीत होते. थोडी कोरडी हवी असेल तर टोमॅटोच्या बिया काढुन टाकाव्यात.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...