Sunday, June 22, 2008

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie)

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची अप्रतीम चव आणि नाविन्य यामुळे कितीहीवेळा गेले तरी काहीतरी नवीन खाल्ल्याचा 'साक्षात्कार' होतो. त्यातलीच एक I Am Lusciously Awake नावाची स्मूदी, माझी अतिशय आवडती. त्यासाठी ४० मैल गाडी चालवायला नको म्हणून करायला शिकलेली :)

Chocolate Smoothie


(प्रमाण एका माणसासाठी आहे)

१ टेबल्स्पून कोको पावडर
१ टीस्पून इन्स्टंट कॉफी
१/२ केळ
२-३ काजु अगर बदाम
२-३ बिया काढलेले खजूर
१/२ कप पाणी
गरजेप्रमाणे बर्फाचे खडे

कृती - खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.

टीप - १. कोको पावडर शक्यतो दूध, साखर न मिसळलेली अशीच वापरावी.
२. साधी कॉफी वापरायची असेल तर पाण्यात कॉफी उकळून, गाळून, थंड करून वापरावी.
३. माझ्याकडे जेव्हा कच्च्या (न भाजलेल्या) चॉकलेटच्या बिया असत तेव्हा त्याच वापरत असे. ती चव अर्थात अप्रतीम येते. कॉफी देखील एका दुकानात कोल्ड प्रेस्ड रॉ कॉफी मिळते ती आणत असे.
शक्यतो यात दूध, साखर वगैरे वापरू नये.

Wednesday, June 18, 2008

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi)

Here is English version of this recipe -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2011/03/sabudana-khichadi.html

साबुदाणा खिचडी ब-याच लोकाना प्रिय असते. मला मात्र त्याचे खूप कौतुक नव्हते. एकतर घरात रोजचा उपास कधी कोणाचा नसे आणि सगळ्यांच्या वेळा सांभाळत मम्मीला असले खास प्रकार करायला सुट्टीच्या दिवसाशिवाय कधी वेळ पण नसे. श्रावणातले सोमवार, महाशिवरात्र याच दिवशी घरी खिचडी असे. हे सगळे संपले हॉस्टेलला गेल्यावर. रात्री मेसमधे भाकरी आणि कसलातरी पाला पाण्यासारखी पातळ आमटी असले दिव्य जेवण असे. मला भाकरीचे वावडे नव्हते पण ती इतकी जाड असे की खायचा कंटाळा यायचा. मग थोडे दिवस आम्ही काहीतरी करुन नेले पण तेही जमण्यासारखे नव्हते. मग त्यावर काढलेला उपाय एकदम 'सॉलेट' होता. आम्ही ६-७ जणी एकत्र जेवत असु. एकेकीने एकेक दिवस वाटुन घेउन रात्री उपास मांडले होते. मग जिचा उपास असेल तिला भात/भाकरी खाऊ घालण्याची जबाबदारी उरलेल्या मुलींवर आणि आलेली खिचडी सगळ्याना वाटणे ही तिची जबाबदारी! असे एक वर्ष काढले.

पुढे उसगावात आल्यावर मग साबुदाण्याबद्दल बरेच काही ऐकले होते, अनुभवही बरेच घेतले. सबुदाणा चांगला आहे की नाही हे बघायचे असेल तर सधरण २ टेबल्स्पून साबुदाणा १५ मिनिटे १/२ कप पाण्यात भिजत ठेवावा. जर तो पाण्यात फुटला नाही तर साबुदाणा ठिक आहे असे समजावे.
Sabudana Khichadi

साबुदाणा भिजवायची क्रुती :

१ कप साबुदाणा एका पातेल्यात घेउन स्वचछ धुवावा. त्यात सबुदाणा बुडेल आणि वर एखादा इन्च पाणी राहील अस भिजवावा. बरोबर १५ मिनीटानी वरचे पाणी काढुन टाकावे आणि झाकण झाकुन रात्रभार साबुदाणा भिजत ठेवावा. सकाळी अगदी एखादा पाण्याचा हबका मारून हलक्या हाताने साबुदाणा मोकळा करावा.

२ कप वरील क्रुतीप्रमाणे भिजवलेला साबुदाणा
१/२ ते ३/४ कप दाण्याचे कूट
३-४ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ, साखर
१/२ लिंबाचा रस
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जिरे

कृती - मिरच्या धुवुन चिरुन घ्याव्यात. साखर, मीठ साबुदाण्यावर घालून नीट मिसळून घ्यावे. एका जाड बुडाच्या कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापले की गॅस बारीक करावा. तेलात जिरे आणी मिरची घालुन १-२ मिनीटे परतवे. त्यावर अर्ध साबुदाणा घालावा. त्यात दाण्याचे कूट घालून उरलेला साबुदाणा घालावा. गॅस थोडा मोठा करुन नीट परतावे. साधारण ३-४ मिनीटे परतल्यावर झाकण झाकून एक वाफ आणावी. झाकण काढून खिचडी नीट परतून घ्यावी. वरून लिंबाचा रस घालून परत थोडे परतून गॅस बंद करावा. हवी असेल तर वरून कोथिंबीर घालून गरम गरम खावी.

टीप - १. खिचडीमधे बटाटे घालायचे असतील तर फोडी करून तेलात न घालता बटाता मोठा मोठा खिसावा. आणि साबुदाण्यावर दाण्यच्या कुटाबरोबर घालून परतावा. कमी तेलात बटाटा घातलेली खिचडी मस्त होते.
२. बरेचदा बटाट्याला पाणी खूप असते अशावेळी खिसलेला बटाटा पिळून घ्यावा.

साबुदाणा उपसाला चालतो का आणि कसा? याचे उत्तर माझ्याकडे नाही. साबुदाणा शाकाहारी आहे का? मी माझ्यापरीने माहीती मिळवायचा प्रयत्न केला. भारतात पदार्थ बनवले जातात त्यावर कोणाचाच कन्ट्रोल नसतो, त्यामुळे बरिचशी माहीती माहीती नसते. अशावेळी द्रुष्टीआड स्रुष्टी असे समजून खायचे किंवा सगळे घरी बनवून खायचे. एक मात्र खरे की साबुदाण्यात पौष्टीक असे काहिही नसते. पूर्णपणे स्टार्च पासुन बनवलेला हा पदार्थ आहे. तेव्हा खाताना जपून खावा.

Wednesday, June 11, 2008

कॅरामल फ्लान (Caramel Flan)

अलीकडे एका मैत्रीणीने मला अवडतो म्हणुन Caramel Flan केला होता. पण जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ असल्याने मी खात नाही तसेच अंडी पण खात नाही म्हणल्यावर तिला वाईट वाटले. पण त्या दिवसापासुन मला आपण वेगन फ्लान करुन पहायचाच असे वाटायला लागले. त्याच प्रयत्नाना आलेले हे फळ -

Caramel Flan

२ कप दूध (सोया, Almond यापैकी कोणतेही)
१ टीस्पून व्हॅनीला एक्स्ट्रॅक्ट
४ टेबल्स्पून साखर
१ टेबल्स्पून अगार अगार फ्लेक्स

कॅरामल साठी -
३-४ टेबल्स्पून साखर
१ टेवल्स्पून पाणी

कृती - अगार अगार पावडर एका वाटीत घालून त्यावर ते भिजेल इतके पाणी घालुन आजुला ठेवावे. जाड बुडाच्या पातेल्यात दूध, साखर एकत्र करून उकळण्यासाठी ठेवावे. एक उकळी आली की त्यात व्हॅनीला आणि अगार अगार घालून गॅस बारीक करावा.

दुस-या गॅसवर एका जाड बुडाचा लहान पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून ठेवावे. ते एक्सारखे ढवळत रहावे. थोड्यावेळात साखरेतले पाणी संपूर्ण आटून परत खडे बनतील. ते तसेच गरम करत रहावे. काही मिनीटातच ते खडे विरघळून पाक होईल. हेच ते कॅरामल. यात आता थोडे पाणी घालून थोडे पातळ राहु द्यावे. ते कॅरामल तुम्हाला फ्लान ज्या भा.ंड्यात बनवायचा आहे त्यात खाली ओतावे.

तोपर्यंत दूधाला नीट उकळी आलेली असेल. ते उकळलेले दूध कॅरामल घातलेल्या भांड्यात गाळुन ओतावे. ते भांडे आता फ्रिजमधे सेट होण्यसाठी ठेवावे. साधारण २-३ तासात फ्लान तयार होईल.

हा तयार झालेला फ्लान आता बाहेर काढुन त्यात कडेने हळूवारपणे सुरी फिरवून पातेल्यापासून सोडवावा. एका दिशमधे हे फ्लानचे भांडे उलटे करावे. थोडा हळुवार धक्का देत फ्लान पातेल्यापासून सोडवून घ्यावा. कापून थंडगार सर्व्ह करावा.

टीप - १. अगार अगार फ्लेक्स म्हणाजे भारतात ज्याला चायना ग्रास म्हणातात तेच.
२. जिलेटीन नावाने जो जेल मिळतो तो प्राणीजन्य असतो.
३. अगार अगारचे फ्लेक्स आणि पावडर दोन्ही मिळतात फ्लेक्स्पेक्षा पावडर कमी लागते. १ टेबल्स्पून फ्लेक्स ऐवजी १.५ टीसून पावडर वापरावी लागेल.
४. सोया, Almond च्या दूधाऐवजी साध्या दुधाचा पण हा पदार्थ करता येतो.

Monday, June 09, 2008

पन्हे (Panhe)

Panhe


सध्या आमच्याइथे खूप गरम होतेय. अचानक तापमान वाढलेय. त्यामुळे शनीवारी घरी पन्हे केले होते त्याचे काढलेले फोटो.

ही रेसिपी इथे मिळेल - झटपट पन्हे

Sunday, June 08, 2008

Peanut Chutney


(Link to Marathi Recipe)

The box in this post is made by me after few tries. It is called dartlington box. It is a good technique to learn. I had fun making it. And the glaze used called Woo-Blue which brakes to give brown color on rough surface. I use my pot with lid to serve my favorite peanut chutney.

1 cup Roasted Peanuts
2-3 Cloves of Garlic (or per taste)
1 tsp Cumin seeds
1 tsp Sugar (optional)
Salt per taste

Preparation - 

Add half of the peanuts in big enough mixer bowl. Add salt, sugar, chili powder, cumin seeds and garlic cloves. Add remaining peanuts over. 
Now cover and start pulsing the grinder slowly to make chutney. Texture should be very coarse and oily. To get that texture pulsing slowly is very necessary. 
This chutney stays good for weeks or even months. 

Tips - 

  1. Solapur's peanut chutney is very tasty and well known in Maharashtra. It is usually made in cast iron mortar pestle. 
  2. Try to use Byadagi to get bright red colored chutney. 
  3. This chutney + fresh yogurt and onion with Jowar roti is eaten for breakfast in various places in Maharashtra. 

शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney)

(Link to English Recipe)


टेबलवर चटण्या घालुन ठेवण्यासाठी एखादे छानसे भांडे असावे असे बरेच दिवसापासुन वाटत होते. मधे २-३ बनवली पण होती. पण काही ना काही कारणांमुळे ती कोणाला तरी द्यावी लागली अथवा नीट fire झाली नाहीत. हे भांडे मात्र बनवताना मनासारखे जमले, रंग पण मनासारखा झाला. आणि टेबलवर ठेवल्यावर अगदी मनापासुन आवडले. आता यात एखादी चटणी करुन ठेवावी असे वाटले. नवीन काहीतरी करण्यापेक्षा नेहेमीची शेंगदाणा चटणी बरेच दिवसात केली नाहीये ही बाब लक्षात आणून दिली गेली म्हणल्यावर तीच केली.


१ कप भाजलेले शेंगदाणे
२-३ पाकळ्या लसूण (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा)
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून साखर
१-२ टीस्पून मीठ चवीप्रमाणे कमी जास्त करावे)
१-२ टीस्पून लाल तिखट

कृती - मिक्सरच्या भांड्यात निम्मे शेंगदाणे घालावेत त्यावर लसूण, तिखट, जिरे, मीठ, साखर घालावे. वरून उरलेले दाणे घालावेत. हळुहळू पल्स करत करत चटणी बारीक करावी. भांड्यात काढून तिखट मीठ व्यवस्थीत आहे क ते पहावे. कमी जास्त हवे असल्यास मिसळून डब्यात भरावे.

टीप - १. सोलापूरकडची दाण्याची चटणी अतीशय प्रसिद्ध आहे. ती लोखंडाच्या खलबत्त्यात कुटुन बनवली जाते. तेवढा वेळ आणि पेशन्स नसल्याने मिक्सरवर पल्स करत हळुहळू करावी त्याने दाण्यातले तेल थोडेतरी बाहेर पडते.
२. कर्नाटकत बॅडगी मिरची म्हणुन मिरचीचा एक प्रकार मिळतो. तो रंगाला अतिशय लाल आणि तिखटाला अतिशय कमी असतो. ते घालून केल्याने चटणीचा रंग एकदम सुरेख लाल येतो.
३. भाकरीबरोबर दही चटणी, आणि कांदा असा नाष्टा बरेच ठिकाणी केला जातो. तेल/तूप लावून मस्त दाण्याची चटणी लावलेली पोळीची सुरळी हे गावाला जातानाचे मोठे आकर्षण असे.

Wednesday, June 04, 2008

टोमॅटो सार/सूप (Tomato Soup)

लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ क्रीम वगैरे घालताना पहिले आणि खूप विशेष वाटले होते कारण माझ्यासाठ सूप हा खूप साधा प्रकार होता/आहे. रेस्टॉरंटमधे मिळणारे Cream of Tomato सूप पण मला फार आवडत नाही ते याच कारणाने.

Tomato Soup

२ मोठे पिकलेले टोमॅटो
गरजेप्रमाणे पाणी
चवीपुरते मीठ
१/२ टीस्पून लाल मिरची पावडर
फोडणीसाठी १ टिस्पून तेल किंवा तूप आणि जिरे

कृती - टोमॅटो धुवुन घ्यावेत. एका मध्यम आकाराच्या पातेल्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घालुन ते उकळायला ठेवावे. पाणि उकळले की त्यात टोमॅटो घालुन बरुन झाकण ठेवुन ५ मिनिटे उकळून गॅस बंद करावा. पाणी थंड झाल्यावर फक्त टोमॅटो मिक्सरमधुन बारिक करुन घ्यावे. साले, बिया आवडत नसतील तर केलेली प्युरी गाळण्याने गाळुन घ्यावी. सूप/सार जितके पातळ हवे असेल त्याप्रमाणे टोमॅटो शिजवलेले पाणी घालावे. एका पातेल्यात तेलाची अगर तुपाची फक्त जिरे घालुन फ़ोडणी करावी त्यावर प्युरी केलेले टोमॅटो घालावेत. अवडीप्रमाणे मीठ, आणि तिखट घालावे. आवडत असेल तर थोडी साखर घालण्यास हरकत नाही.


टीप - १. टोमॅटो शिजवलेले उकळलेले पाणी फ़ेकुन न देता आमटी, भात, भाजी शिजण्यास वापरावे.
२. ते सार थोडे घट्टसर केले तर भाताबरोबर किंवा पुलावाबरोबर मस्त लागते.
३. पातळ केले तर चहासारखे कपमधे घेउन एखादा मूव्ही वगैरे बघत प्यायला मस्त वाटते.

Tuesday, June 03, 2008

कढीगोळे (Kadhigole)

गेल्या महिन्यात कधीतरी एका अश्विनीकडे गेले असताना 'काल आईने कढीगोळे केले होते' असे ती सहज बोलुन गेली. तेव्हा मला अरुंधतीच्या आईने एकदा कढीगोळे खाऊ घातले होते ते आठवले. मम्मी हा प्रकार फारसा करत नसे त्यामुळे खुपच विस्मरणात गेला होता. परवा अचानक भाताबरोबर हेच करु असा विचार आला पण हरभरा डाळ भिजवलेली नव्हती. पण मोड आणण्यासाठी मूग भिजवले होते. काकुना फोन करुन विचारले, होईल का नीट तर काकु म्हणाल्या करुन बघ १-२! शेवटी करुन पाहिलेच! तीच ही रेसिपी -

Kadhigole
गोळ्यांसाठी -
१ कप भिजवलेले मूग
२ हिरच्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
१ बारीक तुकडा आले
१-२ पाकळ्या लसूण
१ टेबलस्पून जिरे
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बेसन अथवा तांदळाचे पीठ

कृती - बेसनाव्यतीरिक्त सर्व सामान मिक्सरवर बारीक वाटुन घ्यावे. अगदी गंधाइतके बारीक नसेल तरी हरकत नाही. एक बाऊलमधे घेउन त्यात बेसन घालुन नीट मिसळावे. त्याचे एक इंच व्यासाचे गोळ करुन बाजुला ठेवावे.

कढीसाठी -
१ कप दही
२ ते अडीच कप पाणी
१ पाकळी लसूण
१ बारीक तुकडा आले
२-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
२-३ टेबल्स्पून बेसन
१ टेबल्स्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळ्द, कढीपत्ता

कृती - मिरची, आले, लसुण मिस्करवर बारीक वाटुन घ्यावे. दह्याचे पाणी घालुन ताक करुन घ्यावे. ताकात बेसन घालुन पूर्ण गुठळ्या न होऊ देता मिसळावे. आले-मिरचीचे वाटण त्या ताकात घालावे. त्यातच मीठ, साखर आणि हळद घालवी. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करुन त्यात तयार केलेले ताक घालावे. गॅस बारीक करुन कढीला नीट उकळी येवु द्यावी. कढी उकळायला लागली की उकळीत एकेक करत गोळे हळुहळु सोडावेत. सगळे गोळे कढीत सोडल्यावर ५ मिनिटे नीट उकळी आणुन गॅस बंद करावा. भाताबरोबर गरम गरम वाढावेत.

टीप - १. कढी थोडी पातळसरच ठेवावी. गोळे टाकल्यावर ती नीट मिळून येते.
२. कढीला उकळी आल्यावर सगळे गोळे एकदम घालण्याऐवजी सुरुवातीला १-२ गोळे घालुन ते फुटत नाहीत ना ते पहावे. फुटले तर गोळ्यात थोडे बेसन किंवा तांदळाचे पीठ घालुन परत गोळे बनवून घ्यावेत व ते कढीत सोडावेत.
३. मुगडाळीच्या साध्या (plain) खिचडीबरोबर ही कढी अप्रतीम लागते.
४. मुळच्या कृतीमधे हरबरा डाळ वाटुन त्याचे गोळे करुन कढीमधे सोडतात. तसे करायचे असतील तरी बाकीची कृती हीच.

Monday, June 02, 2008

शेवयाचा उपमा (Vermicelli Upama)

शनिवारी-रविवारी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न नेहेमी पडतो. कारण प्रत्येकवेळी पोहे, उपीट करायचा कंटाळा येतो. नेहेमीच इडली डोस्याचे पीठ तयार असतेच असे नाही. अशावेळी शेवया घरात असतील तर त्याचा उपमा पण मस्त आगतो. इथे अगदी साधी कृती देतेय पण त्यात बदल करणे अगदी सहजी शक्य आहे.

Vermicelli Upama

१ कप शेवया
२ कप गरम पाणी
१/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
१-२ हिरव्या मिरच्या
चवीप्रमाणे मीठ, साखर
१ टेबलस्पून लिंबाचा रस
१ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग आणि १/२ टीस्पून उडीद डाळ

कृती - शेवया तेल न घालता कढईत थोड्या लालसर रंगावर भाजुन घ्याव्यात. त्या बाजुला काढुन ठेवून त्याच कढईत तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालुन तांबूस रंगावर भाजु द्यावी. त्यातच मिरची घालावी. त्यावर मटारचे दाणे घालुन बारीक गॅसवर २-३ मिनीटे परतावे. त्यावर भाजलेल्या शेवया घालाव्यात व २-३ मिनीटे परतावे. चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओतावे. मिश्रण नीट हलवून झाकावे. शेवयी शिजली नाही आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालुन पुन्हा झाकुन ठेवावे. शेवयी जरा फ़ुलल्या सारखी वाटली की झाकण काढुन ठेवावे. त्यावर लिंव्बाचा रस आणि साखर घालून नीट मिसळावे. उरलेले पाणी आटवून टाकावे. शेवयी नीट शिजली पाहीजे परंतु गिच्च गोळा होता कामा नये.

टीप - १. भारतात आणि अमेरीकेत भारतीय दुकानात भाजलेली शेवयी सर्रास मिळते ती वापरली तर १०-१२ मिनिटात पौष्टीक नाश्ता तयार!
२. आमेरिकेमधे Angel Hair Pastaa मिळतो तो साधारण शेवईसारखाच असतो. तो पास्ता आणुन चुरुन शेवईसारखा वापरता येतो. वेळ असेल तर आख्खे पॅकेट चुरुन भाजुन ठेवावे म्हणाजे गरजेप्रमणे वापरता येते.
३. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा फोडणीत घातला तरी हरकत नाही.
४. उडदाची डाळ मला थोडी कुडकुडीत असेल तर आवडते त्यासाठी मी डाळ भाजली की थोडी फ़ोडणी बाजुला काढते आणी शेवया पूर्ण शिजल्या की त्यावर ओतते आणि नीट मिसळते.

भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...