Friday, October 31, 2008

लाल भोपळ्याची ओरिया पद्धतीने भाजी

सुचित्ता नावाची माझी एक मैत्रिण आहे. आहे म्हणजे आता ती भारतात असते आणि गेल्या ६ वर्षात तिचा माझा काहीही संपर्क राहिलेला नाहिये. त्याचे मुख्य कारण तिच! इथुन परत जातेवेळी ती सांगुनच गेली होती तसे! बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे (स्क्वाश) दिसायला लागले की मला तिची हमखास आठवण येते मात्र. कारण ती आहे ओरिसाची. त्यांच्याकडे भोपळा, पालक, छोले वगैरे घालून एक भाजी करतात. त्यांच्याकडचे ते पंचफोरन फोडणीत घालून. ती कॉलेजला डब्याला आणायची मला लगेचच आवडली होती कारण चव अप्रतीम आणि कष्ट कमी. मी ब-याच प्रकारचे स्क्वाश वापरून करुन पाहिले ही भाजी अ मस्तच होते. तर तिची ही रेसिपी. रेसीपी कदाचीत पुर्णपणे 'ऑथेंटीक' नसेलही पण आहे एकदम साधी आणि सोप्पी.

Oriya Style Squash curry

१ टेबल्स्पून पंचफोरन *
२ सुक्या लाल मिरच्या
२ वाट्या लाल भोपळ्याच्या फोडी **
१/२ वाटी छोले ६-७ तास भिजवून शिजवलेले
३-४ कप चिरलेला पालक
१-२ लहान वांग्याच्या फोडी (वगळले तरी चालेल)
१-२ लहान बटाट्याच्या फोडी (वगळले तरी चालेल)
चवीप्रमाणे मीठ
२ टेबल्स्पून तेल


कॄती - भाजी करायच्या आदल्या दिवशी १/२ वाटी छोले भिजत घालावेत. दुसरे दिवशी धुवुन किंचित मीठ घालुन ते बोटचेपे शिजवून घ्यावेत. भोपळ्याच्या साली काढुन फोडी करुन घ्याव्यात. वांगी, बटाटे घालणार असाल तर त्याच्या पण फोडी करुन घ्याव्यात. सर्व भाज्यांच्या फोडी शक्यतो एका आकाराच्या असाव्यात. पालक धुवुन चिरुन घ्यावा. एका पसरट कढईमधे तेल तापायला ठेवावे. तापल्यावर त्यात पंच फोरण घालून गुलबट रंगावर भाजावे. त्यात लाल मिरच्या प्रत्येकी २ तुकडे करुन घालाव्यात. त्यावर चिरलेले भोपळा, बटाटे, वांगे घालुन गॅस बारीक करुन नीट परतावे. साधारण ५ मिनीटे परतल्यावर पाण्याचा हबका मारून झा़कण घालून भाजी नीट शिजवावी. भाजी शिजत असताना अधुन मधुन हलवावी. खाली लागुन करपत नाहिये ना ते पहावे. त्यावर मीठ घालून परतावे. फळभाज्या शिजल्या की त्यात छोले आणि चिरलेला पालक घालुन झाकावे. पालक शिजायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे फार वेळ गॅसवर ठेवु नये. नीट परतून भाजी चपातीबरोबर वाढावी. ही भाजी नुसती खायला पण मस्त लागते.

* पंच फोरन म्हणजे जिरे, मोहरी, मेथी, कलौंजी, बडीशेप समप्रमाणात घेउन मिसळून ठेवावी आणि त्या मिश्रणातला १ चमचा वापरावा. ती याच मिश्रणात कधीतरी खसखस देखील घालत असे.
** मोठा लाल भोपळा, एकॉर्न स्क्वाश, बटरनट स्क्वाश, बनाना स्क्वाश यापैकी कोणाताही स्क्वाश वापरून ही भाजी अप्रतीम होते.

टीप - १. लहान मुलांना पण ही भाजी तिखट नसल्याने आवडते.
२. सुक्या लाल मिरच्या अगदीच तिखट नसतील तर क्रश्ड रेड चिली फ्लेक्स (पिझ्झाबरोबर पाकिटे मिळतात ते) भाजी शिजताना घालू शकता.
३. ऐनवेळी करायची असेल तर छोल्याचा कॅन वापरला तरी चालतो.


भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...