Tuesday, November 25, 2008

JFI: Carrot

माझ्या काही जुन्या गाजराच्या रेसिपीस एकत्र करुन, काहीचे इंग्लिशमधे भाषांतर(?) करुन खास पोस्ट बनवतेय. त्या रेसिपीज अशा -


All this is for The Best Cooker's JFI: Carrots!

Thursday, November 20, 2008

गाजराचे पराठे (Carrot Paratha)

English version of this recipe can be found here - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotparathas

बाजारात गाजराचे ढीग दिसायला लागले की थंडी आली हे समजत असे देशात असताना. लाल केशरट रंगाच्या गाजराचे ढीग मस्त दिसायचे. मम्मी नेहेमी थोडी मोठी, थोडी लहान अशी मिक्स करुन आणत असे कारण मला ती ताजी गाजरे खायला खुप आवडत असे. गाजराची कोशिंबीर, कधितरी गाजराचा हलवा करणे आलेच. मम्मीने केलेला हलवा मस्त असायचा. तिने कधी खवा वगैरे आणुन हलवा केल्याचे मला आठवत नाही. रोजचे राहीलेले दूध ती आटवून फ्रीझरमधे ठेवत असे. असे ४-५ दिवस करुन त्यात तुपावर भाजलेला गाजराचा खिस घालुन कोरडे होईपर्यंत आटवून त्यात साखर, वेलची, केशर घातले की झालाच हलवा. त्या गाजराची आणि मम्मीने केलेल्या हलव्याची सर इतर कशालाच नाही.

गाजर म्हणले आणखी एक आठवण येते ती म्हणजे हिंदी सिनेमा! हिंदी सिनेमातला आई आणि मुलाचा एक अतिशय प्रेमळ संवाद असतो - "बेटे मैने आज तुम्हारे लिये गाजरका हलवा बनाया है|" तसाच कधितरी "बेटे मैने तुम्हारे लिये आज मूली के पराठे बनाये है|" असे पण ऐकल्याचे आठवते. हे प्रसंग आठवत असताना गाजराचे पराठे आणि मुळ्याचा हलवा का करू नये असा एक अफलातून विचार डोक्यात आला. त्यातल्या पहिल्या विचाराचे हे मूर्त रूप. दुस-या पदार्थाला मूर्त रूप कधी येऊ नये अशी प्रार्थना सध्या माझा नवरा करतोय!!

Carrot Paratha

३-४ मध्यम गाजरे - साधारण २ कप खिस होईल इतपत
२-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त)
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
मुठभर चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून जिरे
पाणी लागेल तसे

कृती - गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.

टीप - १. मी गाजर, मिरच्या सगळे एकत्र करुन फूडप्रोसेसरमधुन काढते. त्यावर ब्लेड बदलून कणिक मळायचे ब्लेड लावले. पीठ, मीठ, कोथिंबीर घालून, थोडे पाणी घालून भिजवते.
२. वरील प्रमाणात साधारण मध्यम आकाराचे १० पराठे होतात.

हे पराठे द कुकरच्या JFI:Carrots साठी ......Wednesday, November 12, 2008

स्वयंपाकाची तयारी

बरेच दिवसापासुन ब-याच कॉलेजला जाणा-या मित्र-मैत्रिणींकडुन ऐकतेय की स्वयंपाकात खुप वेळ जातो. बाहेरचे खाऊन पोट भरतेच असे नाही. नेहेमी तेच तेच खाउन कंटाळा येतो. तेव्हापासुन विचार करतेय की त्यांना उपयोगी पडेल अशा काही गोष्टी लिहाव्यात म्हणुन. पूर्वतयारीचा थोडाफार भाग आणि भारतीय किराणामालाच्या दुकानात न जाता भारतीय स्वयंपाक आणि इटालियन वगैरे पदार्थ कसे करावेत इत्यादी. सगळेच एका पोस्ट मधे होईलच असे नाही. पण हळुहळु बरेच लिहिन म्हणतेय. तर नमनाला फार तेल न जाळता सुरुवात करते -

* आठवड्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी किंवा रविवारी थोडावेळ राखुन ठेवावा तेव्हा निदान आठवड्याचा किराणा भरुन ठेवावा.
* बटाटे, टोमॅटो, पालक, गाजर, काकडी, बीटरुट, कोबी फ्लॉवर, चायनीज/जापनीज वांगी, ढबु मिरच्या हे आणुन ठेवायला विसरु नये.
* झुकीनी, लाल भोपळा, सरसो (मस्टर्ड ग्रीन्स), चार्ड, लाल मुळा वगैरे पण आणायला हरकत नाही.
* लिमा बीन्स, मिळत असतील तर सोयाबीन, मटारचे दाणे, मिक्स वेजीटेबल पॅक, कापलेले ग्रीन बीन्स हे फ्रोजन सेक्शनमधे मिळतात ते आणुन ठेवावेत.
* करायला सोपे जाते म्हणुन फक्त भात करण्यापेक्षा व्हीट ब्रेड, व्हीट पीटा, व्होल व्हीट टोर्टीया खायला सुरुवात तरी करावी.
* भारतीय दुकानात जायला मिळेल तेव्हा डाळी/ कडधान्याचे मोठे पॅक आणुन ठेवावेत.
* एखादा पास्ता जसे की रॉटीनी, मॅक्रोनी, पेने, बो टाय यापैकी लहान प्रकारातला पास्ता आणुन ठेवावा. स्पगेटी, लिन्ग्विनी हे पास्ता लांब असतात त्यामुळे शिजवण्यासाठी बरेचदा मोठे पातेले लागते.
* पास्त्यासाठी एखादा पास्तासॉस आणुन ठेवावा जसे की मारिनारा, गार्डन ब्लेंड याप्रकारचा कोणताही चालेल.
* एखादा इटालियन स्पाईस ब्लेंड आणुन ठेवण्यास हरकत नाही. कारण एखादेवेळी पस्ता सॉस नसेल तर घरच्या घरी टोमॅटो घालुन पण पास्ता सॉस बनवता येतो.
* छोले, राजमा ही धान्ये शिजवण्याआधी भिजवावी लागतात. तेव्हा ते जमणार नसेल तर छोले, राजमाचे कॅन आणुन ठेववेत. चवळीचे कॅन ब्लॅक आईस पीज या नावाने मिळतात ते आणुन ठेवायला हरकत नाही.
* टोमॅटो प्युरी, टोमॅटो पेस्ट आणुन ठेवल्यास कधीतरी टोमॅटोऐवजी पट्कन भाजीत घालायला बरे पडते.


आता बाकीची तयारी काय करता येईल?

* कुकर लावतेवेळी १ वेळा पुरेल इतकीच डाळ/ कडधान्य शिजवण्यापेक्षा कमीत कमी २ वेळा पुरेल इतकी तरी शिजवावी.
* शिजवलेली डाळ (तुर, मूग, मसूर यापैकी कोणतीही डाळ) शिजवून फ्रिझमधे ठेवावी कधीही फोडणी करुन, तिखट, मीठ घालून आमटी करता येते.
* शिजवलेल्या डाळीत थोडे मिठ, हळद घालुन साधे वरण करता येते
* सांबार मसाला, रस्सम पावडर असेल तर ऐनवेळी सांबार रस्सम करता येते.
* तसेच पालक आणला असेल तर डाळ घालुन शिजवून ठेवता येतो.
* मसूर, मूग, चवळी ही कडधान्ये न भिजवता सरळ कुकरला लावुन शिजवता येतात. ती पण शिजवताना कमीतकमी २ वेळा पुरतील इतके शिजवुन ठेवावेत.
* भात पण वेगवेगळ्या प्रकारचे करत येतात त्यासाठी प्रत्येकवेळी वेगवेगळे मसाले असलेच पाहीजेत अशी गरज नसते.


माझ्या ब्लॉगवरच्या सोप्या रेसिपीज मी एकत्र करुन त्यांना एक लेबल लावले आहे. ते इथे पहायला मिळेल -
Newbie Specials!

अजुन काही महत्वाचे लेबल्स -
रोजचे पदार्थ

झटपट पदार्थ


भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...