Wednesday, April 29, 2009

उन्हाळ्यातला गारवा (Cooling Down With Salads)
उन्हाळा आला की मला प्रथम आठवतात त्या वेगवेगळ्या कोशिंबीरी. मम्मी खुप वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी करत असे. त्यातल्या काही आठवतात काही नाही. ज्या आठवतात त्या इथे लिहिल्या आहेत -

कोबीची/गाजराची/काकडीची कोशिंबीर

पालकाची कोशिंबीर


बीटची कोशिंबीर


अजुनही ३-४ प्रकारच्या कोशिंबीरी लिहिल्यात त्या सगळ्या इथे सापडतील -
http://vadanikavalgheta.blogspot.com/search/label/Salad-Koshimbir

Sunday, April 26, 2009

संत्र्याचा भात (Orange Rice)

माझ्या वाढदिवसाला बरेचदा घरी साखरभात आणि बटाटेवडे असा साधा सोपा मेनु असायचा. उन्हाळाच्या सुट्टीत वाढदिवस येत असल्याने कधी मैत्रिणीना बोलावुन वाढदिवस साजरे करणे होत नसे. कॉलेजमधे असताना सुट्टी नसली तरी बरेचदा पी.एल. असे मग कुठला वाढदिवस आणि कुठले काय. जर्नल्स पूर्ण करा, व्हायवा ची तयारी करा असल्या कारणानी वाढदिवसाची वाट लागलेली. त्यामुळे साखरभात = वाढदिवस हे समिकरण मात्र डोक्यात फिट्ट बसलेय. पण गम्मत म्हणजे मी स्वत: साखरभात जवळपास आज्जीबात बनवत नाही. तसे खास कारण नाही पण बनवत नाही येवढेच. परवा एक गम्मत झाली. आवडीने ब्लड ऑरेंजेस आणली आणि एक कापुन खाल्ले आणि मग रोजच्या घाईगडबडीत उरलेल्या २ संत्र्यांकडे लक्ष जवळापास २-३ दिवस लक्ष पण गेले नाही. मग उरलेली संत्री खराब होऊ नये म्हणुन मग रस काढुन पिऊन टाकु म्हणुन रस काढला. ग्लासमधे ठेवलेला तो लालबुंद रस पिणे माझ्याच्याने होईना कारण? अर्थात रंग! 'ब्लड ऑरेंज' असे सार्थ नाव धारण करणार्‍या फळाचा रस आणखीन कसा असणार? मग आता एवढा काढलेला रस काय करायचा? मग ओगलेआज्जी मदतीला आल्या. रुचिराबद्दल मी काय बोलणार? जवळपास प्रत्येक प्रकारची पारंपारीक भाज्या, भात, गोड पदार्थ आज्जीनी त्यात लिहिले आहेत. काही वेळेला एखादी भाजी नवीन प्रकारे करण्यापेक्षा पारंपारीक पद्धतीने करावी वाटते आणि हमखास रेसिपी आठवत नसते तेव्हा आज्जींचे हे पुस्तक मला उपयोगी पडते. रुचिरामधे त्यांनी २ प्रकारचे संत्री भात दिलेले आहेत. त्यातला एक मला सोपा वाटला म्हणुन मी करुन पाहीला. आंबटगोड चविचा हा भात दिसायला अप्रतीम अणि करायलाही अगदी सोपा आहे. मी प्रथम करताना जवळपास तंतोतंत रेसिपी वापरुन केला पण परत एकदा केला तेव्हा मात्र माझ्या पद्धतीने बदल करुन थोडा सोपा केला. तीच ही रेसीपी -

Blood Orange Rice
१ कप तांदूळ
१.२५ कप साखर (आवडीप्रमाणे कमी जास्त करावी)
२ कप संत्र्याचा रस
१ कप पाणी
किंचीत मीठ (जास्तीत जास्त १/४ टीस्पून)
५-६ काजु/बदाम/पिस्त्याचे काप
१ संत्रे सोलुन पकळ्या काढुन
१ संत्र्याची साल खिसुन (ऑरेंज झेस्ट)

कृती -
संत्रे नीट सोलून पाकळ्या सुट्ट्या करुन फक्त गर काढुन बाजुला ठेवावा. तांदूळ धुवुन त्यात पाणी, संत्र्याचा रस, ऑरेंज झेस्ट आणि मीठ एकत्र करुन राईस कुकरला शिजवण्यास ठेवावा. भात शिजला की लगेचच साखर आणि संत्र्याचा गर घालुन नीट मिसळावे. त्यातच काजु/बदामाचे काप घालुन थोडावेळ राईसकुकर परत चालू करावा. मिसळलेली साखर आता विरघळेल आणि पाक तयार होईल. पाक थोडा आटत आला की कुकर बंद करुन थोडावेळ भात नीट मुरु द्यावा. गरम गरम खाण्यास द्य्यावा.

टीप -

1. राईसकुकर नसेल तर तांदळात संत्र्याचा रस, मीठ आणि पाणी एकत्र करुन जाड बुडाच्या पातेल्यात नुसताच गॅसवर ठेवुन भात शिजवून घ्यावा भात अर्धवट शिजला की ऑरेंज झेस्ट आणि काजु-बदामाचे काप घालून पूर्ण शिजु द्यावा. गॅस अगदी बारीक करुन साखर आणि संत्र्याच्या पाकळ्या मिसळाव्यात. लोखंडाचा तवा भात शिजवलेल्या पातेल्याखाली ठेवुन गॅसची आच मंद करावी आणि झाकण ठेवुन साखरेचा पाक नीट घट्ट होऊ द्यावा. पाकाचे पाणी आटले की गॅस बंद करुन भात नीट मुरु द्यावा.
2. भात शिजवताना गरजेप्रमाणे पाणी कमी आधीक करावे.
3. भारतात साखर बरीच मोठी असते त्यामुळे ती मिक्सरमधुन थोडी बारीक करुन घ्यावी.

Thank you Khaugiri for passing this wonderful award to me!I will like to pass this on to Vaishali!

Sunday, April 19, 2009

Strawberry Lemonade

काल-परवापर्यंत थंडी पडतेय असे वाटत असतानाच अचानक तापमान वाढायला लागले. आईस टी, स्वीट टी, लेमोनेड वगैरे काहीतरी करायला लागणार अशी टळटळीत दुपार. भारतात उन्हाळ्यात पन्हे, लिंबाचे गार सरबत, अंबील असले पदार्थ घरात नेहेमी असतात. इथे हे सगळे करायला हरकत नसते पण मग बरेचदा कंटाळा पण येतो करायचा. संत्री, टँजरीन खाउन खाउन किती खाणार? अशाच एका टळटळीत दुपारी केलेले हे स्ट्रॉबेरी लेमोनेड. समोर मैत्रिणीच्या घरची मायर लेमन्स पडलेली, कोपर्‍यावरच्या बाबाकडे घेतलेल्या मस्त ताज्या स्ट्रॉबेरीज पण होत्याच आणि त्या उन्हाने वाया जाउ नये म्हणुन काय करावे हा विचारच चालु होता. त्यातुनच सुचलेला हा पदार्थ मागे कधीतरी असलेच काहीतरी काकुकडे प्यायलेही होतेच. करायला हा प्रकार एकदम सोपा.

Floating Strawberry ice cube

स्ट्रॉबेरी क्युब्ज:
१०-१२ मोठ्या स्ट्रॉबेरीज
४-५ पुदिन्याच्या काड्या
१-२ टेबलस्पून साखर (वगळण्यास हरकत नाही)
चिमुटभर मीठ

कृती -
स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवुन देठ काढुन मोठ्या मोठ्या चिरुन घ्याव्यात. पुदिना धुवुन त्याची फक्त पाने काढुन घ्यावीत. एका मिक्सरच्या भांड्यात दोन्ही टाकावे. स्ट्रोबेरीज खुप अंबट असतील तर थोडी साखर आणि एक चिमुट मीठ घालुन सगळे नीट बारीक करावे. एका रिकाम्या आईस ट्रे मधे ओतुन फ्रीझरमधे सेट करायला ठेवावे. ह्या झाल्या स्ट्रॉबेरी आईसक्युब्ज.


Lemonade

स्ट्रोबेरी लेमोनेड:

नेहेमीप्रमाणे लिंबाचे सरबत करुन घ्यावे आणि फ्रीजमधे ठेवुन गार करावे. विकतचे लेमोनेड आणले तर पिंक लेमोनेड शक्यतो आणु नये. ते पण थोडे फ्रीजमधे ठेवुन थंड करुन घावे. देतेवेळी एका ग्लासमधे लेमोनेड घालुन त्यात स्ट्रॉबेरी आईसक्युब घालुन पिण्यास द्यावे. आईसक्युब जसा वितळत जाईल तसा स्ट्रॉबेरीचा स्वाद लेमोनेडला येईल.

टीप -

1. रासबेरी, ब्लुबेरी, ब्लॅकबेरी अशा कोणत्याही बेरीचे आईसक्युब्ज करता येतील. रासबेरी आणि ब्लॅकबेरी मधे बिया खुप असतात त्यामुळे तयार झालेला पल्प मी गाळुन घेते. आणि मग सेट करायला ठेवते.
2. एकदा करुन झालेले क्युब्ज फ्रीझर सेफ डब्यात घालुन ठेवले तर बरेच दिवस वापरता येतात.

Monday, April 13, 2009

बेक केलेली मटारची करंजी (Baked Matar Karanji)

भारतात डिसेंबर जानेवारीमधे मटार मिळायला लागले की आठवणीने आणि आवडीने केले जाणारे पदार्थ म्हणजे मटार भात, मटार उसळ, एकुणात ज्यात म्हणुन मटार घलता येईल त्यात घालुन सिझनचा आनंद लुटायचा. त्यातलाच अजुन एक पदार्थ म्हणजे'मटारची करंजी'! सामोसा वगैरे प्रकार मला त्यामानाने खुपच उशिरा समजले त्याआधी ही करंजिच खुप आवडत असे. मग जरा शिंगे फुटल्यावर समोसे खाणे कसे ग्रेट वगैरे वाटे. घराबाहेर पडल्यावर मात्र मम्मीच्या हातच्या करंज्याची चव कश्शाला म्हणुन नाही हे चांगलेच कळले.तर अशी ही मटार करंजी स्वत: करायची वेळ आली तेव्हा मात्र जीव आगदी हैराण! अमेरिकेतल्या अपार्टमेंट मधले एवढेसे ते किचन एक दिवस तळण केले तर २ दिवस तो वास घरात भरुन राहिलेला हे सगळे आणि त्यातुन कधईत ओतलेले तेल कमी झालेले पाहिले आणि तळण या प्रकारची एकदम धस्तीच बसली ती इतकी की आता मोठे किचन असुनही एकही तळण मी करत नाही. मग एकदा धाडस करुन या करंज्या बेक केल्या त्या एवढ्या चामट झाल्या की परत कानाला खडा. खुपदा पायक्रस्ट आणुन प्रयोग कराव वाटे पण त्यातल्या बटरचे प्रमाण पाहुन धाडस मात्र कधी झाले नाही. मागच्या महिन्यात वैशालीची Empanadas रेसिपी दिसली आणि माझी ट्युब एकदम संपूर्णच पेटली. मग एक प्रयोग करुन पाहीला आणि एकदम सक्सेसफुल हो! मग अजुन एकदा केला आतले सारण बदलले पण करंजिच्या पारीमधे फार काही फरककेला नाही. आम्हा दोघान पण खूप आवडले आणि अजुन एक-दोन मैर्त्रीणीना पण. हीच ती रेसिपी. याचे सगळे श्रेय वैशालीला -

Baked Matar karanji

करंजीच्या पारीसाठी -
२ कप गव्हाचे पीठ (मी कणिक वापरली)
३ टेबलस्पून एक्स्ट्रा वर्जिन ऑलिव ऑईल
३ टेबलस्पून अर्थ बॅलन्स (हे वेगन नॉन ट्रान्सफॅट शॉर्टनिंग आहे)
१/२ टीस्पून मीठ
१ टीस्पून ओवा भरड ठेचुन
१ टीस्पून लाल तिखट (नाही घातले तरी हरकत नाही)
बर्फाचे पाणी लागेल तसे.

कृती - पिठात तेल, अर्थबॅलन्स, मीठ, ओवा, तिखट घालुन एकदा नीट मिसळुन घ्या. थंडगार पाण्याने कणिक अगदी घट्ट भिजवा. ही कणिक पुरीच्या कणकेपेक्षादेखील घट्ट असते. पीठ जरा एकत्र आले की शक्यतो पाणी न वापरतामळुन एखाद्या हवाबंद डब्यात किंवा प्लास्टीकच्या रॅपमधे गुंडाळुन कमीतकमी १ तास फ्रीझमधे ठेवावे.

सारणासाठी -
१ ते दीड कप मटार दाणे (मी फ्रोझन वापरले)
२ लहान बटाटे (एक ते दीड कप खीस होईल इतके)
लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे
१ टीस्पून साखर
१/२ लिंबाचा रस
चिरलेली कोथिंबीर १/४ कप

फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हळद

कृती - मटारदाणे मायक्रोवेवमधे ३० सेकंद गरम करुन बाजुला ठेवले. तेल मध्यम आचेवर तापत ठेवावे. दरम्यान बटाट्यांची साल काढुन मोठे मोठे खिसुन घ्यावे. तेलात नेहेमीप्रमाणे फोडणी करुन त्यात बटाट्याचा खीस घालावा. हलक्या हाताने परतावे. खीस भांड्याला लागण्याची शक्यता आहे म्हणुन गॅस वाढवू नये. आता त्यात मीठ, तिखट घालावे. मटारदाणेवाटीने वगैरे थोडे ठेचुन घ्यावेत म्हणजे मग करंज्या फुटत नाहीत. हे ठेचलेले मटार बटाट्यात घालावेत. बारिक गॅसवर झाकण ठेवुन एक छान वाफ येउ द्यावी. बटाटे शिजलेत का बघावेत. शिजले नसतील तर झाकण ठेवुन अजुन एखादी वाफ येउ द्यावी. आता त्यात लिंबाचा रस, साखर घालुन नीट मिसळावे. कोथिंबीर घालावी. गॅसवरुन सारण खाली उतरवून त्यावर झाकण ठेवुन १५-२० मिनीटे बाजुला ठेवावे. असे थंड होताना झाकण ठेवल्याने बटाटा जर खाली चिकटला असेल तर तो वाफेने सुटुन येतो.

Step by Step!करंजी
-
फ्रीजमधे ठेवलेले पीठ बाहेर काढुन त्याचे एकसारखे १२ गोळे करावेत. प्रत्येक गोळ्याची साधारण ४ इंच व्यासाची पुरी लाटावी. पुरीच्या मधे साधारण २ टेबल्स्पून सारण ठेवुन नेहेमीप्रमाणे(*) करंजी करावी. या करंजीच्या कडा नीट दाबुन घ्याव्यात आणि त्यावर फोर्कच्या ४ दातांनी नीट प्रेस करावे, असे केल्याने कड नीट सील होते आणि नक्षीदेखील मस्त दिसते. सगळ्या करंजा अशाप्रकारे करुन एका बेकिंगशीट वर ठेवाव्यात. एका वाटीत १ टेबलस्पून तेल आणि एक टेबलस्पून दूध एकत्र करुन हे मिश्रण प्रत्येक करंजीवर लावावे. ओव्हन ४०० डिग्री फॅरेन्हाईट्ला चालू करुन करंज्या साधारण २०-२५ मिनीटे बेक कराव्यात. वरुन गुलबट सोनेरी झाल्या की ओव्हन बंद करुन शीट बाहेर काढुन थोडी वाफ जाऊ द्यावी. केचप, चटणी, हॉटसॉस कशाबरोबरही ह्या करंज्या एकदम मस्त लगतात.

(*) वर स्टेप बाय स्टेप फोटोमधे दाखवल्याप्रमाणे

टीप -
१. समोस्याचे सारण करुनही ह्या छान लागतात. बटाटेवड्याच्या सारणावरही प्रयोग करायला हरकत नाही.
२. आवडत असेल तर सारणात थोडा गोडा किंवा गरम मसाला घालू शकता. पण मला हे बिना मसाल्याचे जास्त आवडले.Sunday, April 05, 2009

काकडीचे थालीपीठ (Kakadiche Thalipeeth)

English version of the this recipe.

थालीपीठ हा बहुदा प्रत्येक मराठी माणसाचा वीक पॉइंट असतो. कांद्याचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ, धपाटे असले वेगवेगळे प्रकार खाण्यासाठी अगदी प्रत्येकाने आईकडे लाडीगोडी लावलेली असते. गरम थालीपीठ आणि त्यावर मस्त घरच्या लोण्याचा गोळा यासरखे सुख नाही. अमेरिकेत आल्यावर पहिले सुख कमी होते ते म्हणजे घरचे दही, दूध, लोणी वगैरे. त्यानंतर मग बॅगमधे घालुन आणलेली घरची भाजणी संपली की मग रहाते ते आईच्या हातच्या थालीपीठाची चव आठवुन भारतवारीची वाट पहाणे किंवा मग लोकल दुकानातुन केप्रची थालीपीठ(बरेचदा कमितकमी एक वर्ष जुनी) भाजणी आणुन त्याची थालपीठे गोड(?) मानुन गिळणे. इथल्या बर्‍याच दुकानातुन आजकाल केप्रची पीठे, मसाले मिळातात तरी. ७-८ वर्षापुर्वी तर तेवढेही नव्हते. अशा परिस्थीतीत मग वेगवेगळे शोध लावणे भाग पडते. तसाच लागलेला हा शोध. एकदा काकडीची थालिपीठे खायची इच्छा झाली आणि घरी भाजणी नव्हती. मग काय घरात होती ती पीठे एकत्र केली आणि गॅसवर भाजली आणि एकादाची थालिपीठे करुन खाल्ली. मग पुढच्यावेळी करताना ओव्हनमधे भाजले. मग २-३ वेळा करुन ओव्हनच्या तापमानाचे गणित पक्के केले. आता घरची भाजणी संपली की केप्रच्या वाटेला जायची खूप गरज नसते.

Kaakadiche Thalipeeth

१ कप गव्हाचे पीठ
०.५ कप तांदुळाचे पीठ
०.५ कप बेसन
०.५ कप ज्वारीचे पीठ (नसेल तर गव्हाचे पीठ घालावे)
१ मध्यम आकाराची काकडी खिसुन
१-२ हिरव्या मिरच्या
०.५" आले
१-२ पाकळ्या लसुण
१ टेबल्स्पून जिरेपूरड
१ टेबलस्पून धणेपूड
मीठ - चविप्रमाणे
हळद, चिरलेली कोथिंबीर, एक छोटा खडा गूळ
तेल लागेल तसे
पाणी लागेल तसे

कृती - सगळी पीठे एकत्र करुन एका बेकिंगडिशमधे ठेवावीत. ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाईट वर चालू करुन त्यात ही पीठाची डिश ठेवावी. ओव्हन प्रीहीट होत असताना एकदा मधे पीठ हलवावे. ओव्हन प्रीहीट झाला की बंद करुन टाकावा, अजुन एकदा पीठ नीट हलवावे आणि डीश तशीच अजुन ५ मिनीटे ओव्हनमधेच ठेवावी. दरम्यान मिरच्या, आले, लसूण एकत्र वाटावे. काकडी खिसुन घ्यावी. त्यात वाटण, गुळ, मीठ, कोथिंबीर, हळद, जिरे-धणेपूड घालुन नीट मिसळुन ठेवावे. ५ मिनीटाने बाहेर काढुन काकडीच्या मिश्रणात घालावे. चमच्याने सारखे करुन ५-७ मिनीटे तसेच ठेवावे. काकडीला सुटलेल्या पाण्यात बरेचदा पीठ नीट भिजते. पण गरज लागली तर थोडे पाणी लावून पीठ थापता येण्याजोगे भिजवावे. गॅसवर तवा तापत ठेवावा. पोळपाटावर ओले फडके/पंचा/रुमाल घालुन त्यावर एक मोठ्या लिंबाएवढा पीठाचा गोळा घेउन पाण्याच्या हाताने थालीपीठ थापावे. थापलेल्या थालिपीठाला मधोमध एक आणि त्याच्या कडेने ४ अशी ५ भोके पाडावीत. यामुळे थालीपीठ नीट भाजले जाते.आता फडक्यासहीत थालिपीठ उचलून तव्यावर उलटे टाकावे आणि हलक्या हाताने फडके सोडवून घ्यावे. पाडलेल्या छिद्रातून एकेक थेंब तेल तव्यावर सोडावे. गरज असेल तर कडेने ३-४ थेंब तेल सोडावे. एका बाजुने भाजुन झाले की उलटवून दुसरीबाजू देखील नीट भाजावी. मस्त खमंग थालीपीठ काकडीच्या कोथिंबीरीबरोबर, लोणच्याबरोबर खावे.

टीप -
१. दिलेल्या प्रमाणात ६ मध्यम आकाराची थालिपीठे होतात.
२. मिरची, लसूण न घालता नुसते आले आणि थोडे लाल तिखट घालून ही थालीपीठे करता येतात.
३. काकडीऐवजी कांदा घालुनही मस्त लागते.
४. अगदी बांगडीएवढी लहान थालीपीठे केली तर अपेटाईझर म्हणुन मस्त लागतात.

Wednesday, April 01, 2009

ग्वाकमोले आणि सालसा (Guacamole and Salsa)

भारतातुन इकडे आल्यावर बर्‍याच नविन प्रकारचे पदार्थ ऐकायला आणि पहायला मिळतात. आणि माझ्यासारख्या खवय्यीला तर मग काय खाउ आणि काय नको असे होऊन जाते. पहिल्यांदा जेव्हा चिलिज नावाच्या रेस्टॉरंटमधे गेले तेव्हापासुन मला सालसा आणि ग्वाकमोले खुप आवडायला लागले. मग काकुने मला आव्हाकाडो कसा कपायचा वगैरे शिकवले आणि तेव्हापासुन बरेचदा वेगवेगळ्या प्रकारे करुन पाहिले. आत्ता लिहितेय ती रेसिपी सगळ्यात सोपी आणि आवडीची. अशाच प्रकारे सालसा पण वेगवेगळ्या प्रकारचे करते आणि आवडतात देखील. मी जेव्हा फक्त रॉ फूड खात होते तेव्हा या रेसिपींनी मला बराच हात दिला होता. कारण वेगवेगळ्या स्वादाचे सालसे नुसते वाटीभर-भरुन खायला मजा येते.

ग्वाकमोले
Guacamole

१ आव्हाकाडो
१ टोमॅटो
४-५ टेबल्स्पून चिरलेला कांदा
१ लसूण पाकळी
१ टीस्पून जिरेपूड
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबाचा रस
मुठभर चिरलेली कोथिंबीर
आवडत असेल तर बारीक चिरलेली मिरची १/२ ते १ टीस्पून

कृती:
१. कांदा, टोमॅटो बारिक चिरुन घ्यावा.
२. कोथिंबीरही शक्यतो बारिक चिरलेली असावी
३. मिरची घालायची असेल तर अगदी बारीक चिरुन किंवा वाटुन घ्यावी.
४. लसुण बारिक चिरुन अथवा आले खिसायच्या खिसणीने खिसुन घ्यावा.
५. जिरेपूड, मीठ, लिंबुरस, टोमॅटो, कांदा, लसुण, कोथिंबीर एका बाऊलमधे एकत्र करावे.
६. आव्हाकाडो मधोमध अर्धा करावा. त्यातले बी काढुन टाकावे. त्या कवचातच आव्हाकाडोला उभे-आडवे कप मारुन चिरावे. आता चमच्याने आव्हाकाडोचा गर कवचापासुन वेगळा करुन एका वेगळ्या बाऊलमधे त्यावा. फोर्कने तो गर व्यवस्थित मॅश करावा.
७. मॅश केलेला गर कांदा टोमॅटोच्या गरात व्यवस्थीत मिसळावा.

ग्वाकमोले तय्यार!
टिप:

१. हिरवी मिरची नको असेल तर पिझ्झाबरोबर चिलीफ्लेक्स मिळतात ते थोडे घालायला हरकत नाही.
२. टोमॅटो कांद्याचे मिश्रण आधी करुन ठेवुन ऐनवेळी आव्हाकाडो घालावा. कारण आव्हाकाडो हवेने काळा पडतो.

अव्हाकाडो मॅश न करता कांदा टोमॅटो सारख्या बारीक फोडी करुन त्यात बारीक चिरलेला आंबा, अननस वगैरे घालुन एक प्रकारचा सालसा पण होतो.

सालसा
सर्व प्रकारच्या सालसासाठी खालील साहित्य कमी आधिक प्रमाणात लागते. याव्यतीरिक्त लागणारे साहित्य कॄतीनुसार दिले आहे.

रसदार टोमॅटो
लाल कांदा
कोथिंबीर
हिरवी मिरची
मीठ
लिंबु

क्रमवार पाककृती:

प्रकार १ -
१ वाटी बारीक चिरलेला कांदा, २ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ लिंबाचा रस, १/२ वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरुन किंवा थोड्या भरड वाटुन. हे सगळे नीट एकत्र करुन आवडी प्रमाणे मीठ घालायचे. हा झाला 'पिको दी गायो' (Pico De Gallo) सालसा. आपल्या टोमॅटोच्या कोशिंबीरीत कूट न घालता केले तर हा प्रकार होतो. मिरच्या चविप्रमाणे कमी जास्त करायच्या.

Salsa 2

प्रकार २ -

टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकायचे १ मिनीटात बाहेर काढायचे. आणि थंड पाण्यात टाकायचे. साल काढुन टाकायची. ४ टोमॅटो, १ लहान (खुपच मोठा कांदा असेल तर साधारण १/४ कांदा), १ हिरवी मिरची, असे सगळे चॉपर मधुन काढायचे. प्युरी इतके बारीक न करता भरड ठेवायचे. आवडीप्रमाणे मीठ व कोथिंबीर घालुन थोडे लिंबु पिळले आणि मिसळले की झाला सालसा तयार.

प्रकार ३ -
आवडीनुसार पपई, अननस, आंबा (तोतापुरी प्रकारातला)
कॄती -
पिको दी गायो मधे पपई, आंबा, अननस यापैकी एका फळाचे बारीक तुकडे करुन घालायचे.


भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...