साबुदाण्याच्या पापड्या - १ (Sabudanyachya Papadya)

आत्ता ऊन आहे तर आत्ता लगेचच पापड्या करायच्यात असे कधी उन्हाळ सामानाचे होते का? त्याला कसं मस्तपैकी ऊन पडलं पाहिजे ३-४ दिवस सलग! मग आजुबाजुच्या बायका/मुली नक्की कशाचा घाट घालणार आहेत याचा आढावा घ्यायचा. उद्या दिवसभरात नक्की कोणती कोणती कामे मार्गी लावायची आहेत याची यादी करायची. हे सगळे केल्यावर मस्तपैकी चहा करून घ्यायचा आणि दुसर्‍या दिवसाचा परत एकदा आढावा घ्यायचा. रात्रीचा स्वयंपाक करून जेवणे झाल्यावर शांतपणे २ कप साबुदाणा स्वच्छ धुवुन पाण्यात भिजत घालायचा.
आता गेल्यावर्षी जपून नीट ठेवलेले प्लास्टिकचे पेपर्स हुडकायला लागायचे. अगदी जपून ठेवलेले असल्याने ते सापडायला उशीर व्हायला लागतो तसे मगाशी कशाला उगीच चहा पित बसलो त्याऐवजी हे काम केले असते तर बरे म्हणुन स्वतःलाच शिव्या घालायच्या! हे सगळे चालू असताना सकाळी ५ ला उठायचेय याची आठवण होऊन स्वतःला अजुन थोड्या शिव्या घालत भराभरा सगळा पसारा अजुन एकदा उलटपालट करायचा! आता पापड्या घालायला बारक्या बारक्या दुधाच्या पिशव्या/Ziplock कापत बसाव्यात का असला तुफान विचार चालू असताना पिशव्यांचे अगदी जपून ठेवलेले गाठोडे हातात येते. मग पहाटे ४ चा एक, ४.३० चा एक आणि ४.४५ चा एक असे ३ गजर लावून झोपुन जायचे. ४ चा गजर झाला की बंद करायचा, ४.३०चा पण बंद करायचा. शेवटी ४.४५ चा गजर झाल्यावर पापड्यांची आठवण होऊन किचनमधे धावायचे. तेवढ्यात 'वर्षाची साठवणीची कामे पारोश्याने करायची नसतात' हे आईचे वाक्य आठवून चरफडत आंघोळीला धावायचे! शेवटी ५.३०ला ४ ते ५ कप पाणी उकळायला ठेवायचे. मिरची वाटून घ्यायची. वाटलेली मिरची, जिरे, मीठ एकत्र करून ठेवायचे. बटाटा सोलून, धुवुन, खिसुन घ्यायचा. हे सगळे भिजलेल्या साबुदाण्यात मिसळून ठेवायचे.

Just spread

तोवर पाणी खळखळून उकळलेले असेल. एक कप पाणी बाजुला काढून ठेवायचे. गॅस कमी करून हळूवारपणे साबुदाणा पाण्यात सोडायचा. पळीने किंवा उलथण्याने हलवायचे. मिश्रण घट्ट होयेत असे वाटले तर बाजुला ठेवलेले गरम पाणी थोडे थोडे घालायचे. साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत ठेवायचे. मग साबुदाण्याचे गरम गरम मिश्रण घेऊन न सांडता लवंडता गच्चीवर जायचे. काल इतक्या प्रयत्नांनी शोधलेले मेणकागद सोबत न्यायला विसरायचे नाही. मेणकागद नीट पसरायचा, कडेने वजन म्हणून दगड ठेवायचे आणि पळीने पापड्या घालायचा घ्यायच्या. मिश्रण जसे जसे थंड व्हायला लागेल तसे घट्ट होते. त्यामुळे पटापटा पापड्या घालायच्या. शेवटचे काही मिश्रण दाण्यांबरोबर खायला ठेवायचे.

Dried Papadya ready for frying.

मस्तपैकी एक कप चहा करून घेऊन पाय पसरून बसायचे. जेवायला फक्त मसालेभात हा एकच पदार्थ करणार असे डिक्लेर करायचे. उरलेले पापडाचे मिश्रण चवीचवीने दाण्याबरोबर खायचे. स्वयंपाक करून जेवुन आपल्या कष्टाचे फळ बघायला गच्चीवर जायचे. पापड्या मेण कागदापासून सुट्ट्या होत असतील तर करून एखादी हळूच मटकवायची. उरलेल्या उलट करून खाली यायचे. रात्री सगळे चंबू गबाळे नीट खाली आणून दुसरे दिवशी वाळवायला परत उन्हात ठेवायचे. अगदी कडकडीत वाळले की डब्यात भरून ठेवायचे. लागेल तसे तळून, मायक्रोवेव्ह करून खायचे.

Microwaved Papadya.

आता ह्याचे साहित्य एकत्र लिहिते - 
२ कप साबुदाणा
साधारण ६-७ कप पाणी
१ टीस्पून जिरे
एखादी मिरची
आवडत असेल तर एखादा बटाटा
चवीप्रमाणे मीठ
टीप - 
  1. प्रमाण फक्त २ कपचे दिलेय. पूर्वी बायका एकेकावेळी अडशिरी-पायलीच्या (अडीच किलो-पाच किलो) घालत असते. आपण येवढे करून पाहिले तरी पुरे :)
  2. मिरची, जिरे, बटाटा चवीसाठी घालायचे. घातले नाही तरी चालते. नुसते मीठ घालूनही करता येतात!
उन्हाळ्यात गव्हाचा चिक आणि त्याच्या कुरवड्या करणे हा एक मोठा उद्योग असतो. तर हा गव्हाचा चीक करायचा आहे? त्याची रेसिपी इथे पहा - http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/03/celebrating-three-years-of-blogging.html

Comments

  1. फोटोसाठी निळी पार्श्वभूमि वापरण्याची कल्पना मस्त! छान दिसतोय फोटो! :-)

    ReplyDelete
  2. फ़ोटो छान आहे. मला तुमचे सर्व ब्लॉग फ़ारच आवडतात.त्यातलाच Embroidery Blog पण आहे. तुम्हाला शिवणकामातही जर रस असेल तर तुम्ही आम्हाला पंजाबी ड्रेस कसा शिवायचा ते ब्लॉगच्या माध्यमातुन सांगू शकाल का? Please

    ReplyDelete
  3. Abhijit, Ratrani - thank you!

    Anonymous - sorry, mala shivaNakam yet nahi.

    ReplyDelete
  4. Mastch!! attaparyant me ya blog chi silent reader hote pn he post itaka mast aahe ki rahawala nahi.
    ani recipe pekshahi
    "saabudanyachya papadya - samagra itihaas A-Z" mast jamalay.sagla vatavarn ubha rahila dolyasamor.
    i miss those gud old days

    ReplyDelete
  5. Snigdha, thank you, I am glad you liked it.

    ReplyDelete
  6. सुरेश बुद्धिसागरFeb 27, 2012, 3:56:00 AM

    लय खास लिखाण ...! अगदी माझं लहानपण आठवलं ...! आम्ही खानदेशीच पण साबुदाण्याचे पापड आणि मसाले भाताचे कॉम्बिनेशन अगदी ditto. आमच्याकडे पण असे. शब्द न् शब्द (पापड्या मेण कागदापासून सुट्ट्या होत असतील तर करून एखादी हळूच मटकवायची). असेच लिहा पदार्थ पटकन शिकून होतील

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.