हरभर्‍याच्या पानांची भाजी (Stir Fried Tender Garbanzo Leaves)

हरभर्‍याची पेरणी साधारण ऑगस्ट सप्टेंबरमधे केली जाते (आठवा इयत्ता ३-४ मधली रब्बी पिके). साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमधे पिके वाढून ५-६ इंची होतात. या झाडांची खुडणी केली नाही तर फुले कमी येतात परिणामी घाटे/हरभरे कमी येतात. ही खुडणी म्हणजे झाडाचे शेंडे तोडायचे. खुडणी करण्यासाठी मोलाने बायका लावतात किंवा घरचे सगळे मिळून जर करता येत असेल तर मग तसे मिळून केले जाते. तुम्ही खुडाल त्या भाजीतला चवथा/पाचवा हिस्सा तुमचा आणि वर थोडी हजेरी असा साधारण व्यवहार पूर्वी असे. हे एका झाडाला एकदाच केले जाते. अलिकडे १० वर्षात त्यात नक्की किती आणि काय बदल झालाय कल्पना नाही.

Fresh HarabaRyaachi bhaaji

हे खुडलेले शेंडे म्हणजेच हरभर्‍याची भाजी. वाट्यातून आलेली भाजी काही बायका विकायला नेतात तर काही घरी करतात. शेतकरी मात्र भाजी बरीच असेल तर विकायला बाजारात नेतो. या भाजीवर पूर्वी औषध फवारणी होत नसे कारण भाजी खायला वापरतात. त्यावर आळ्या वगैरे असण्याची शक्यता असल्याने भाजी आधी झटकून घ्यायची असते. साधारण १ फुट आंतरावरून एकेक ओंझळभर भाजी कट्ट्यावर आपटायची त्याने पानांना चिकटलेली आळी वगैरे असेल तर बाजूला जाते. अशी सगळी भाजी करून घ्यायची.

काही भाज्यांमधे थोडे जून झालेले दांडे काढून टाकावे लागतात. त्यासाठी त्याही बारीक पाने उजव्या हाताने ओढायची. दांडा टाकून द्यायचा. अत्यंत किचकट काम पण पुढले फळ अत्यंत चविष्ट असल्याने करायचेच. हे असे सगळ्या वाट्याचे करून झाले की मग भाजी करण्यासाठी तयार!!

Even more closeup

पूर्वी एखादा रुपायाला ओंझळभर भाजी येत असे आता त्याच ओंझळीचा दर साधारण ५-७ रुपये झाला आहे. काही ठिकाणी किलोच्या मापात (म्हणजेच वजनी हो!) मिळते. पण शेतकर्‍याला कष्टाच्या प्रमाणात मोबदला हवा असेल तर शक्यतो ढिगाच्या मापात विकलेले परवडते!

सातारा, सांगली, कोल्हापूर भागात साधारण ऑगस्त-सप्टेंबरमध्ये रब्बी पिकांची पेरणी सुरु होते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर भागात ही भाजी बाजारात काही आठवडेच मिळते. बाकीच्या ठिकाणी पण मिळत असावी पण मला कल्पना नाही. तेव्हाच आणून ताजी करायची किंवा मग पुढे वर्षभर वापरण्यासाठी वाळवून ठेवायची. सुकवलेल्या हरबर्‍याची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात.

हरभर्‍याच्या भाजीचे २-३ वाटे     
२-३ हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या
५-६ लसूण पाकळ्या
२-३ टेबलस्पून दाण्याचे कूट
चवीप्रमाणे मीठ

HarabaryaachI Bhaji Tayyar!

भाजी निवडून घ्यावी.
स्वच्छ धुवून १०-१५ मिनीटे निथळायची.

प्रकार १ -
मिरचीला उभ्या चिरा देऊन घ्यायच्या. लाल मिरची वापरणार असाल तर मोडून तुकडे करून घ्यायच्या.
एका लोखंडाच्या कढईत/तव्यात तेल तापवून त्या लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या.
मिरच्या घालून एखादा मिनीट परतून घ्यायचे.
त्यावर भाजी घालायची, मीठ घालून झाकण घालून ठेवायचे.
साधारण २ मिनीटांनी झाकण काढून नीट मिसळून घ्यायचे. पाणी खुप सुटलेले असेल भाजीला त्यामुळे नीट परतून भाजी सुकी करायची. शेवटी दाण्याचे कुट घालून परतून गरम गरम भाकरीबरोबर खायला सुरुवात करायची.

प्रकार २ -
भाजी कोरडी करून त्यात कच्चे तेल, मीठ, लाल तिखट आणि दाण्याचे कुट घालून कालवायचे. हे तोंडीलावणे म्हणून खायचे असते.

टीपा -
  1. या भाजीला परतत असताना खूप पाणी सुटत नाही. त्यामुळे एखादेवेळी लागला तर एखादा पाण्याचा हबका मारायला हरकत नाही. 
  2. भाजी निवडायला बराच वेळ लागतो त्यामुळे आदल्या दिवशी टीव्ही पहाताना वगैरे भाजी निवडून ठेवायची.


Bookmark and Share

Comments

  1. Tuza blog wachun NEHMICH tondala pani sutate :)

    I wish you stayed somewhere near!

    BTW ikde hi bhaji milte ka?

    ~Mrinal

    ReplyDelete
  2. Thanks Mrinal. Unfortunately I have not seen this particular vegetable here. But you can grow your own garbanzo beans and make it :)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.