थाई स्टाईल बटरनट स्क्वाश सूप

थंडीच्या दिवसात सूप करून पिणे हा माझा नेहेमीचा कार्यक्रम असतो. गरम गरम सूप आणि एखादा छानसा ब्रेड असेल तर मस्त जेवण होते. वेगवेगळे विंटर स्क्वाशबाजारातसाधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खूप दिसायला लागतात. ते आणून वेगवेगळ्या सूपमध्ये वापरले कि चव एकदम बहारदार येते. यात मला आवडणारा प्रकार म्हणणे साधारण फोडी करून वाफवून घ्यायच्या, जायफळ, काळीमिरी आणि मीठ घालून मिक्सरवर बारीक करायचे की झाले सूप तयार! अलीकडे ऑफिसच्या कॅफेमधे हा जरा वेगळा प्रकार खाल्ला आणि खुपच आवडला त्यामुळे घरात होते त्या सामानात करुन पाहिला. आता हा प्रकार माझ्याकडे नेहेमी होतो.

Thai style butternut squash soup

१ मध्यम बटरनट स्क्वाश - साले आणि बिया काढून चिरलेला
१ टीस्पून तेल
१ कप नारळाचे दूध
१ जाडसर दांडा लेमनग्रास
१ टेबलस्पून आले बारीक चिरून
१-२ काफिर लाईमची पाने
चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी

कृती -
बटरनट स्क्वाश नीट धुवून सालकाढणीने साले काढून टाकावीत. हा तसा बराच कडक असतो त्यामुळे सांभाळून. मग त्याचे दोन तुकडे करून बिया धागे काढून टाकावेत. बटाटे चिरतो त्याप्रमाणे चिरुन घ्यावे.
लेमनग्रासचे साधारण २-२ इंचाचे तुकडे करून ते बत्त्याने किंचीत ठेचून घ्यावेत.
एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल घालून त्यावर या चिरलेल्या फोडी, लेमनग्रास, आल्याचे तुकडे, काफिर लाईमची पाने सगळे घालून  साधारण ३-४ मिनीटे नीट परतावे.
त्यावर एखादा कप पाणी घालून झाकण लावून फोडी नीट शिजवाव्यात. साधारण ५-६ मिनीटात शिजतील.
त्यातले लेमन ग्रास आणि लिंबाची पाने काढून टाकावीत.
हँडब्लेंडरने किंवा साध्या ब्लेंडरने प्युरी करून घ्यावी. खुप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे.
आता बारीक गॅसवर पातेल्यात ही प्युरी उकळत असताना त्यात मीठ, काळी मिरपूड घालावी.
हळूहळू नारळाचे दूध घालत जाऊन नीट मिक्स करावे. अगदी बारीक गॅसवर एक उकळी आणावी.
गरमागरम सूप कप मधे अगर बाऊलमधे घेऊन प्यायला सुरुवात करावी.
टीपा -
  • बटरनट स्क्वाशच्या ऐवजी कोणताही तांबड्या भोपळ्याचा प्रकार वापरू शकतो.
  • काफीर लाईमची पाने नसतील तर साध्या लाईमच्या सालीचे तुकडेपण वापरता येतात. त्याचाही स्वाद चांगला लागतो.
  • आवडत असेल तर थोडी थाई करी पेस्ट वापरायला हरकत नाही. पण ही वेगन/वेजीटेरीअन आहे याची खात्री करून वापरावी.
  • मी लाईट कोकोनट मिल्क वापरते.
Bookmark and Share

Comments

  1. छान! भोपळ्याचे काळीमिरी घालून करून बघीन!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.