आलेपाक पोहे

(Link to English Recipe)

एप्रिल-मे महिना म्हणले की मला आठवते तो कडक उन्हाळा आणि त्याबरोबर रंगपंचमी, वार्षिक परीक्षा आणि उन्हाळ्याची सुट्टी! अगदी याच क्रमाने सुरु होणारे हे ग्रीष्माचे दोन महीने. उन्हाळ्याच्या सुट्टीमधे परीक्षा झाल्यावर गावाला जायला मिळणार म्हणून आम्ही अगदी खूष असायचो. अशाच एका सुट्टीत माझ्या एका आत्याचे लग्न होते म्हणून आम्ही बेळगावला रहायला गेलो होतो. आम्ही जवळपास १० चुलतभावंडे एकत्र जमलो होतो. सकाळी उठल्यापासून आमचा दंगा सुरू व्हायचा. टीव्ही नव्हता त्यामुळे वेगवेगळे खेळ खेळणे हा आमचा उद्योग सकाळी दूध प्यायल्यावर सुरु व्हायचा. घराच्या गच्चीवर पत्रे, साड्या, लाकडे जे काही सापडेल ते वापरून आम्ही एक झोपडी बनवली होती. त्यात सकाळपासून आम्ही काही ना काही खेळत असू. आम्ही तिघी बहिणी अगदी आनंदाने तासनतास भातुकली खेळायचो. दुपारचे जेवण साधारण १ वाजता व्हायचे. जेवणे झाल्यावर उन्हात जाऊन खेळायला बंदी असे म्हणून मग आम्ही पत्ते खेळत बसायचो. भिकार सावकार, झब्बू, लॅडिस, जजमेंट असे अनेक खेळ मी तेव्हा शिकले. तासनतास खेळायचो. पत्ते खेळताना बरेचदा भांडणे व्हायची. एकदा आमची भांडणे इतकी मोठ्याने झाली की आमचे पत्ते पाणी तापवायच्या चुलीत जाऊन शहीद झाले. नवीन पत्ते आणायला परत पैसे कधी मिळाले नाहीत. मग दुपारी पुस्तके वाच, थोडावेळ झोप, चित्रे काढ असे काहीतरी करत दिवस संपत असे. पण याच काळात आम्ही चुलत भावंडे एकमेकांचे खुप चांगले मित्र बनलो. घरात कानडी-मराठी दोन्ही बोलले जाई त्यामुळे माझे कानडीचे ज्ञान वाढले आणि माझ्या बेळगावमधे रहाणार्‍या भावंडांची मराठी भाषा थोडी सुधारली.तिथे आजीच्या देखेरेखीखाली सगळ्यांना दूध-नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळचा खाऊ, तिन्हीसांजेला शुभंकरोती, रात्रीचे जेवण चालायचे. नाष्ट्याला पोहे, इडली, उप्पीट, अप्पे असले काहीतरी असे. जेवणात आमटी, उसळ, भाजी, भात, ताक, भाकरी आणि अंबील असे.

त्याच सुट्टीत खाल्लेला अजून एक पदार्थ म्हणजे आलेपाक पोहे. घरी कोणीही नाव घेतले की घरातले लहान-मोठे सगळे अगदी लाळ गाळल्यासारखे चेहरे करायचे. अगदी त्याच आठवड्यात दोनवेळा जरी खाल्ले गेले असले तरी अगदी हीच अवस्था असायची. जेव्हा पहिल्यांदा मी त्या पोह्यांचे नाव ऐकले तेव्हा मला वाटलेले काहीतरी गोड प्रकरण असेल. आलेपाक आणि पोहे एकत्र करून काहीतरी केलेले असेल असा माझा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र ते प्रकरण अगदी वेगळे निघाले. उसाचा रस आणि आलेपाक पोहे, कानडी भाषेत आलेपाक अवल्लक्की, हे दोन पदार्थ एकदम विकले जातात बहुदा. तिखट पोहे, गोड रस एकदम झक्कास चव असते. आजीने हे पोहे घरी केलेले मला आठवत नाहीत. प्रत्येकवेळी विकतचेच खाल्लेले आठवतात. दोन एक वर्षांपूर्वी मला या पोह्यांची खुपच आठवण आल्यावर आजीला कृती विचारली होती. तिने साधारण काय काय घटक पदार्थ असतात ते सांगितले होते. तेव्हा खाल्लेल्या पोह्यांची चव आता फारशी लक्षात नाही पण मला जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा आज्जीच्या पद्धतीने हे पोहे मी करत असते. महाराष्ट्रातल्या दडपे पोह्यांचेच हे कर्नाटकी भावंड असे बनवतात -

Alepak_Pohe


( ही रेसिपी माहेर मासिकाच्या एप्रिल २०११ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती)

 २ कप पातळ पोहे
५-६ टेबलस्पून ओले खोबरे आल्याचा लहान तुकडा
२ - ३ हिरव्या मिरच्या
२ - ३ टेबलस्पून फुटाण्याचे/पंढरपुरी डाळे
१/२ लिंबाचा रस १ टेबलस्पून साखर चवीप्रमाणे मीठ
१/४ कप धुवून बारीक चिरलेली कोथींबीर
आवडत असतील तर भाजलेले शेंगादाणे सोलून पाकळ्या करुन

कृती -

पोहे चाळून निवडून बाजुला ठेवावेत.
आले, मिरची आणि फुटाण्याचे डाळे एकत्र करून बारीक पूड करावी. थोड्या वाटणाचे ४ छोटे लाडू बांधुन ठेवावेत. पोहे, खोबरे, कोथिंबीर, साखर, मीठ एकत्र करावे. किंचित पाण्याचा हाबका मारायचा गरज असेल तर.
दाणे घालणार असाल तर तेही घालून मिसळावे.
१५ मिनीटे पोहे मऊ होऊ द्यावेत. त्यावर बारीक केलेले आले-मिरची-फुटाण्याचे वाटण घालून नीट मिसळावे.
तयार पोह्यांचे ४ भाग करून सोबत एक एक वाटणाचा लाडु द्यावा.
खाताना लाडु फोडून मिक्स करावा.

टीपा - 
शक्य असेल तर उसाचा रस आणून त्याच्यासोबत हे पोहे खावेत.
ओले ताजे खोबरे अर्थात मस्त लागते. पण फ्रोझन खोबरे पण छान लागते.
फोटोमध्ये लाल पोहे वापरले आहेत.

Comments

  1. veglach prakar ahe ha! I love pohe in any way, shape or form - gotta try this!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.