उडदाचे पापड आणि आठवणी


शाळांमधील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे आजुबाजुच्या घरी पोळपाट-लाटणी घेऊन पापड करायला यायचे 'निमंत्रण' आम्हाला मिळत असे. मम्मीला शिवणाचे बरेच काम असल्याने त्या कामावर माझी रवानगी होत असे. आमचा घरचा पोळपाट पांढरट सनमायका लावलेला होता. आणि बर्‍याच मुलींना त्यावर पापड लाटायची इच्छा असायची. त्यामुळे सगळ्या मैत्रिणी त्या दिवसापुरत्या का होईना माझ्याशी नीट बोलत. हीच कथा दिवाळीच्या करंज्या करताना!

या उन्हाळीसामानाच्या, उद्या मी करते, परवा तू कर अशा बायकांमधे चर्चा होताना कधी-मधी ऐकायला यायच्या. वळवाच्या पावसाच्या अंदाजानुसार एकेकीचे बेत ठरायचे. बरोबरीने कुणाच्या पाटावरच्या शेवया, कुणाच्या मशीनवर केलेल्या शेवया, भाजीचे सांडगे, तळणीचे सांडगे, खिच्चे, बटाट्याचे पापड, वेफर्स, उपासाच्या चकल्या, कुरवड्या, भातवड्या, पापड्या, सालपापड्या असे विविध प्रकार बायका करत असत. त्यातही काहींचा अगदी सरळसोट कारभार असे तर काही त्यातही वेगवेगळे रंग वगैरे घालून वेगळेपण दाखवत. एखाद्याच्या घरात जर लग्न असेल तर मग दुप्पटीने करायचे असे. आणि मुलीचे लग्न असेल तर मग रंगीत पापड वगैरे रुखवतासाठी केले जाई. गव्हले, मालत्या वगैरे खिरीचे ५ प्रकार करून बुरडाकडून आणलेल्या बारक्या सुपात किंवा दुरर्ड्यांमधे ठेवले की मस्तच दिसत.  जरा मोठी शिबरी(बुट्ट्या) आणुन त्यात हे सगळे उन्हाळसामान नीट लावून त्यावर जिलेटीन कागद लावून रुखवतासाठी माळ्यावर कोणाचा हात लागणार नाही अशा जागी ठेवत. माझ्या मम्मीचे हे सगळे प्रकार खुप नाजुक होतात म्हणून आजुबाजुच्या एकदोन लग्नात तिच्याकडून लोकांनी करून नेलेले पण मला आठवतात.

तर आपण काय बोलत होतो? उडदाचे पापड!!
उडदाचे पापड करायचे म्हणजे तयारी त्यामानाने कमी लागायची. उडीद डाळ आणून वाळवून एकदम बारीक दळून आणली जाई. ही डाळ दळायला नेली की गिरणीवाला हमखास ३-४ वेळा विचारून डाळ वाळवून आणली आहे ना याची खात्री करायचा. एखादा वस्ताद तर ४-५ डाळी स्वतः कुडुमकुडुम खाऊन खात्री करून घेतल्याशिवाय चक्कीत घालायचा नाही. एखाद्या घरचे खटले जर मोठे असेल तर सहजी ३-४ किलोचे पापड त्यांच्याकडे केले जायचे.
डाळ दळून आणली की एकदा कोरड्या पेपरवर चाळून घ्यायची. त्यातून लावण्यापुरती वेगळी काढायची. मग एका मोठया परातीत पापडाचा माल मसाला आणि पीठ सगळे नीट एकत्र करून घ्यायचे. आणि पाण्याची अगदी बारीक धार सोडत पीठ घट्ट मळून घ्यायचे. हे पीठ इतके घट्ट असे की जणू काही क्रिकेटचा बॉलच! मग तेलाचा हात लावून पीठ डब्ब्यात घालून ठेवले जाई.

सकाळी उठुन मग घरची बाई हे पीठ कुटायला बसे. तेलाचा हात लावून खलबत्त्यात एकावेळी साधारण ४-५ पोळ्यांचे किंवा त्याहुनही कमी पीठ एकावेळी कुटले जाई. मदतीला कोणी असेल तर मग ५-६ घाव मारून झाले की मदतनीस थोड्या तेलाच्या हाताने दोन्ही हाताने ते पापडाचे पीठ ओढून-एकत्र करून-ओढून-एकत्र करून असे फेसत असे. यामुळे पापड एकदम हलका होई. आता हे चालू असताना, घरची चिल्लर आणि पुरुषमंडळी पिठ खाण्यासाठी मधुन मधुन डोकावून जात. हा कार्यक्रम सगळ्या पिठाचा करून झाला की ते पीठ तेल लावून मग पुन्हा झाकुन ठेवले जाई.

मग रोजचा स्वयंपाक, जेवणखाण उरकले की घरच्या चिल्लरपैकी एकजण गल्लीत सगळ्या घरी जाऊन पापड करायला पोळपाट-लाटणे घेऊन या असे 'आवताण' देऊन येत असे. मग आपापल्या घरची कामे उरकुन मग बायका मुली पापडाला बसत. एकटी गोळ्या करून त्याला तेल लावून ठेवी. ह्या गोळ्या करायला खुपदा खजुरी दोरा वापरला जात असे. क्वचीत एखादीकडे सुरी असायची. एखादी लहान मुलगी असेल तर ती लहान पापड लाटून देई मग एखादी तेच पापड मोठे करत असे. हे मोठे पापड करणार्‍या असत त्यांच्याकडे रेषा-रेषांची, चौकडीची मस्त लाटणी असत. पापडांचे तेल मुरल्याने मस्त तुकतुकीत झालेल्या या लाटण्यांचे मला फार कौतुक होते! त्याने पोळपाटावर मजेशीर असा सरसर-करकर असा आवाज येई. असे २५-३० पापड झाले की गोळ्या करणारीची पापड सावलीत वाळवण्यासाठी साडीवर पसरण्यासाठी नेमणूक होत असे. मधुन मधुन लाटणार्‍यांसाठी लाट्या, चहा, सरबत असा खुराक चालू असे आणि महत्वाचे बरेचसे गॉसिप सोबत चघळायला असे. करमणूकीसाठी टी.व्ही. नव्हते त्यामुळे अमकीचे लग्न, सिनेमाच्या स्टोर्‍या, गाणी, अमकीच्या लग्नात काय झाले, तमक्याने नविन सायकल घेतले असले चर्वित चर्वण सरसर होणार्‍या पापडांबरोबर पटापट पुढे सरकत असे. हे पापड सगळे सावलीतच कोरडे करत असत. पापड कडक उन्हात वाळवला तर तुकडे पडतात म्हणून मग असे आधी सावलीत आणि एक सकाळ कोवळ्या उन्हात वाळवले जात. त्यामुळे गप्पांमधे कधी खंड पडत नसे. हा हा म्हणता २-३ किलोचे पापड सहज होऊन जात. मग घरची बाई सगळ्यांसठी परत एकदा चहा करी. सोबत जाताना रात्री खिचडीबरोबर खाण्यासाठी ५-६ पापड सोबत देई. येवढे पापड लाटल्यावर घरच्या भाकर्‍या थापायचे त्राण कोणाकडेच नसत!!

नवा दिवस उजाडला की परत कोणाचे तरी आमंत्रण आणि परत हाच प्रयोग, हीच पात्रे फक्त स्टेज निराळे!

आमच्या घरचे पापड मात्र मी साधारण ५-६ वीत असल्यापासून मी आणि मम्मी दोघीच करत आलो आहे. रोज १/२ किलोचे पीठ भिजवून असे २ किंवा तीन दिवस हे पापड करायचे कारण बर्‍याचदा इतक्या घरचे पापड केल्यावर बायका उरका पाडल्यासारख्या जाड जाड पापड करत किंवा मग मम्मीच्या शिवणकामानंतर साधारण ४ ते ६ वगैरे आम्ही पापड करत असू. पापड नीट गोल होत नसेल तर शिकण्यासाठी मम्मीने कित्येकदा पापड मोडून गोळा करून करत करायला लावले आहेत :) आता ते टॉर्चर वाटते पण तेव्हा नीटपणाची सवय लागली ती पुढे कधी सुटली नाही.

मम्मीचे पापडाचे प्रमाण असे -
१ किलो उडीद डाळ वाळवून दळून आणायची. लावण्यासाठी १-१.५ वाटी पीठ काढून ठेवायचे.
२० ग्रम पापडखार खडे फोडून चाळून घ्यायचा
बारीक मीठ पाव वाटी
१०-२० ग्रॅम मिरे
हिरव्या मिरच्या ६-७ किंवा चवीप्रमाणे
एक-दोन गड्डे लसूण (आवडत असतील तर)
जीरे १ टेबल्स्पून (छान दिसतात म्हणून)

कृती -
मिरी मिक्सरवर बारीक करून घ्यायची.
हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र वाटून घ्यायचे.
चाळलेल्या पिठात हे सगळे नीट मिसळायचे. अगदी हळूहळू पाणी घालत पीठ घट्ट भिजवायचे. पीठ मू अजिबातच भिजवायचे नाही.  पुरीच्या पिठाहूनही कठीण असते हे पीठ. बोट लावले तर बोट जराही आत नाही गेले पाहिजे.
दुसरे दिवशी खलबत्त्यात कुटायचे, ताणून ताणून फेसायचे.
कमीत कमी पिठावर पापड लाटायचे.

लहान प्रमाणात करून पहायचे असेल तर १ कप पीठ, १ टीस्पून पापडखार, १ टीस्पून मिरे, एखादी मिरची वापरून पापड करून पहाता येतील :)

असेच मुगाच्या डाळीचे पापड करतात पण ते पीठ खुप लवकर मऊ पडते. आभाळ आलेले असेल तर पापड करत नाहीत कारण पीठ मऊ पडते म्हणतात.


Comments

  1. apatim, lahanpanchi aathwan zali sundar lihaley

    ReplyDelete
  2. अगदी लहानपणाची आठवण झाली. या वर्षी पापड करताना हि रेसिपी ट्राय करेन.

    ReplyDelete
  3. लहानपण आठवलं, वाटी che प्रमाण दिलेत thanks

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.