भारतीय पद्धतीने फलाफल आणि सॅलड (Falafel and Salad - Indian Style)

ही रेसिपी मी मायबोलीच्या २००७ च्या गणेशोत्सवातील पाककला स्पर्धेमधे दिली होती. (३० मिनिट मील अशी स्पर्धा होती)

तयारीसाठी वेळ - साधारण १०-१५ मिनीटे
वाफ़वण्यास लागणारा वेळ - १५ मिनीटे
फलाफल -
साहित्य -
१ जुडी मेथी (बारिक चिरुन) किंवा फोझन मेथी २ वाट्या
१/२ वाटी कणिक (चपातीचे पीठ)
१/२ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
२ लसुण पाकळ्या
१ चमचा जिरे
१/२ चमचा हळद
१/२ वाटी दही
चविप्रमाणे मीठ

कृती -

* गॅसवर चाळणी ठेवता येईल इतक्या पातेल्यात साधारण १ ते दीड लिटर पाणी तापायला ठेवावे.
* मिरची, लसुण, मीठ, आणि जिरे एकत्र बारीक करुन घ्यावेत.
* परातीमधे किंवा मोठ्या बाउलमधे मेथी मधे दही घालुन बारीक केलेले वाटण घालुन नीट मिसळुन घ्यावे.
* त्यात हळद आणि तांदुळाचे पीठ घालावे.
* थोडी थोडी कणिक घालत मळावे. भाजी फ़क्त एकत्र मिळुन यावी इतपत घट्ट असावे. खुप पीठ घालु नये.
* शेवटी हाताला थोडे पाणी लावुन ते नीट गोळा करावे.
* ह्या पीठाचे छोटे छोटे मुटके करुन तेल लावलेल्या चाळणीत घालुन ती चाळण उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी.
* त्यावर झाकण ठेवुन १५ मिनीटे वाफवुन घ्यावेत.

इतर साहित्य -
१ काकडी चकत्या करुन
१-२ टोमॅटो चकत्या करुन
१ वाटी चिरलेला लेट्युस (असेल तर)
१ वाटी दही
१ काकडी खिसुन पाणी पिळुन काढुन फक्त खीस घ्यावा
१/२ चमचा जिरेपुड
चविप्रमाणे मीठ, साखर
टोमॅटो केचप जरुरीप्रमाणे
३ पीटा ब्रेड (शक्यतो whole wheat) किंवा ३ पोळ्या अगर टॉर्टीया

Assembly -
(हे अगदी खाण्याच्या वेळेला करावे)

* वाफवलेल्या मुटक्यांच्या १ इंच जाडीच्या चकत्या करुन घ्याव्यात
* दही, काकडीचा खीस, मीठ, जीरेपूड, साखर एकत्र करुन नीट मिसळुन घ्यावे
* पीटा ब्रेडला मधे कापुन अर्धा भाग पोकळ करुन त्यात मेथीच्या मुटक्याच्या ३-४ चकत्या घालाव्यात.
* त्याच्या कडेने २-२ काकडीच्या चकत्या, १-१ टोमॅटोच्या चकत्या घालाव्यात.
* त्यात थोडे केचप आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर घालावी
* वरुन चिरलेला लेट्युस घालावा आणि सर्व्ह करावे.

काकडीची कोशिंबीर सोबत असेल तर पूर्ण मील होते. उरलेले मुटके पण नुसते खाता येता.

टीप -

* मेथी निवडायला वेळ लागतो तो या रेसीपी मधे धरलेला नाही.
* फ्रोझन मेथीमुळे तो वेळ वाचतो. फ्रोझन मेथी घेताना रूम टेंपरेचरला आल्यावर पिळुन घ्यावी. ते पाणी टाकुन द्यावे.
* काकडीचे पाणी टाकुन न देता मीठ, जिरेपुड घालुन पिण्यास वापरावे.
* मेथीच्या ऐवजी पालक वापरला तरी हरकत नाही.
* पीटा ब्रेड मिळत नसेल तर टॉर्टीया किंवा पोळ्या वापरुन wrap करता येतो. त्यासाठी पोळी पसरुन त्यावर मुटक्याच्या चकत्या टोमॅटो, काकडी, लेट्युस, केचप, कापडीची कोशिंबीर घालुन गुंडाळावी.

सॅलड
१ टोमॅटो - मोठे तुकडे करुन
१ काकडी - मोठे तुकडे करुन
२ वाट्या - लेट्युस मोठा कापुन
२ चमचे ऑलिव्ह ऑईल
१ चमचा लिंबाचा रस
चिमुट्भर मीठ, साखर, मिरीपुड

कृती - लिंबाचा रस, मीठ, साखर, मिरीपुड, तेल एकत्र करुन फोर्क ने १-२ मिनिटे फेटुन ठेवावे.
काकडी, टोमॅटो, लेट्युस एकत्र करुन एका पसरट बाऊल मधे ठेवावे.
वाढण्यापुर्वी त्यावर एकत्र केलेले सॅलड ड्रेसिंग घालुन हलक्या हाताने मिसळावे.

टीप - ह्या सॅलडमधे ढबु मिरची, शिजलेल्या बीटचे तुकडे, खिसलेले गाजर घालता येते.

Comments

  1. While I made a few trips to gulf, being a vegetarian, Falafal always came to my rescue.

    Should try this India version!

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts