गाजराचे पराठे (Carrot Paratha)

English version of this recipe can be found here - http://vadanikavalgheta.googlepages.com/carrotparathas

बाजारात गाजराचे ढीग दिसायला लागले की थंडी आली हे समजत असे देशात असताना. लाल केशरट रंगाच्या गाजराचे ढीग मस्त दिसायचे. मम्मी नेहेमी थोडी मोठी, थोडी लहान अशी मिक्स करुन आणत असे कारण मला ती ताजी गाजरे खायला खुप आवडत असे. गाजराची कोशिंबीर, कधितरी गाजराचा हलवा करणे आलेच. मम्मीने केलेला हलवा मस्त असायचा. तिने कधी खवा वगैरे आणुन हलवा केल्याचे मला आठवत नाही. रोजचे राहीलेले दूध ती आटवून फ्रीझरमधे ठेवत असे. असे ४-५ दिवस करुन त्यात तुपावर भाजलेला गाजराचा खिस घालुन कोरडे होईपर्यंत आटवून त्यात साखर, वेलची, केशर घातले की झालाच हलवा. त्या गाजराची आणि मम्मीने केलेल्या हलव्याची सर इतर कशालाच नाही.

गाजर म्हणले आणखी एक आठवण येते ती म्हणजे हिंदी सिनेमा! हिंदी सिनेमातला आई आणि मुलाचा एक अतिशय प्रेमळ संवाद असतो - "बेटे मैने आज तुम्हारे लिये गाजरका हलवा बनाया है|" तसाच कधितरी "बेटे मैने तुम्हारे लिये आज मूली के पराठे बनाये है|" असे पण ऐकल्याचे आठवते. हे प्रसंग आठवत असताना गाजराचे पराठे आणि मुळ्याचा हलवा का करू नये असा एक अफलातून विचार डोक्यात आला. त्यातल्या पहिल्या विचाराचे हे मूर्त रूप. दुस-या पदार्थाला मूर्त रूप कधी येऊ नये अशी प्रार्थना सध्या माझा नवरा करतोय!!

Carrot Paratha

३-४ मध्यम गाजरे - साधारण २ कप खिस होईल इतपत
२-२.५ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी जास्त)
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
मुठभर चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून जिरे
पाणी लागेल तसे

कृती - गाजरे धुवुन साले काढुन खिसुन घ्यावीत. हिरव्या मिरच्या आणि जिरे वाटुन गाजराच्या खिसात घालावे. त्यातच चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात बसेल इतके पीठ घालून १०-१५ मिनीटे ठेवावे. १५ मिनिटानंतर थोडे पाणी लावून कणीक मळावी. भिजवलेली कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी. त्यावर नेहेमीप्रमाणे पराठे करावेत. गरम गरम पराठे लोणचे, चटणी, कोशिंबीरीसोबत फस्त करावेत.

टीप - १. मी गाजर, मिरच्या सगळे एकत्र करुन फूडप्रोसेसरमधुन काढते. त्यावर ब्लेड बदलून कणिक मळायचे ब्लेड लावले. पीठ, मीठ, कोथिंबीर घालून, थोडे पाणी घालून भिजवते.
२. वरील प्रमाणात साधारण मध्यम आकाराचे १० पराठे होतात.

हे पराठे द कुकरच्या JFI:Carrots साठी ......







Comments

  1. कालच रात्री जेवायला 'काय करावं?' असा प्रश्न पडला असताना तुझं हे पोस्ट पाहिलं आणि ताबडतोब हे पराठे केले. गोड लोणच्यासोबत झक्कास लागले! :)

    ReplyDelete
  2. chanach watayet hey parathe nakki karun pahin :)

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts