स्टर फ्राय भाज्या

स्टर फ्राय केलेल्या भाज्या हा चायनीज रेस्टारंट मधील एक आवडता प्रकार. बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या एकत्र असतात. थोडा भात किंवा नूडल्स घातल्या की पोटभरीचे जेवण होते. मी हा प्रकार बरेचदा घरी करायचे पण कधी नीट झाला नाही. एखादी भाजीतरी अती  शिजवायची आणि मग ते सगळे प्रकरण अगदीच  बोअर लागायचे. अलीकडे एका शेफबरोबर बोलणे झाले तेव्हा मी माझा हा प्रॉब्लेम सांगितल्यावर "सगळ्या भाज्या वेगवेगळ्या परतणे" हाच त्यावरचा सोपा उपाय असे कळले. मग लगेच प्रयोग करून पाहिले तर एकदम परफेक्ट जमलं. सगळ्या भाज्या छान कुरकुरीत तरी शिजलेल्या आणि  सॉस सगळीकडे नीट लागलेला अशा या परतलेल्या भाज्या छानच लागतात.


साहित्य -

१ मध्यम आकाराचे गाजर, साल काढून
१ मध्यम आकाराची ढबू मिरची
१ मध्यम गड्डा ब्रोकोली
१ मध्यम गड्डा फ्लॉवर
१ कप १सेमी क्युब केलेला टोफू
एक लहान कांदा
३-४ पातीचे कांदे (भारतात असते त्याचे कांदे नाही वापरायचे फक्त पातच वापरायची)
चवीप्रमाणे मीठ

सॉस/ड्रेसिंगचे साहित्य-

१ टीस्पुन रेड चिली सॉस (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१-२ टेबलस्पून सोयासॉस
१-२ टेबलस्पून व्हिनेगर (मी बाल्सामिक वापरले)
१ टीस्पून ओबडधोबड लसूण पेस्ट
१ टीपून किसलेले आले (ऑप्शनल - १/२ कप शिजलेला किन्वा/भात्/दलिया)


कृती -
ड्रेसिंगचे साहित्य सगळे एकत्र करुन ध्या. आणि बाजूला ठेवा.
सगळ्या भाज्या धुवुन घ्या. कापून सगळ्या भाज्या वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत. एकत्र करायच्या नाहीत.
ब्रोकोली, फ्लॉवरचे मध्यम तुरे करुन घ्या. दांडे तिरके कापून घ्या.
गाजर साल काढून तिरके तिरके पातळ स्लाईस करुन ठेवा.
कांदा, ढबू कापून त्याचे पण १/२" चौकोनी तुकडे करुन घ्या.
पातीचा कांदा स्लाईस करुन ठेवा.
गॅसवर कढई तापायला ठेवा. कढई व्यवस्थीत तापली की त्यात एक १/२ टे.स्पून तेल घाला आणि ब्रोकोली घाला, त्यावर किंचीत मीठ भुरभुरवा. भरभरा हलवा. ब्रोकोली अर्धवट शिजली की एका प्लेट्/मोठ्या बाऊलमधे ठेवा. आता अशीच एक एक भाजी/टोफू वेगवेगळी परतून घ्या आणि बाजूला ठेवा. शिजवलेल्या भाज्या एकत्र केल्या तरी चालतील. शेवटची भाजी परतून झाली की त्यावर आता सगळ्या भाज्या टाका, एकत्र केलेला सॉस अर्धा ओता, भरभर हलवा. चव बघा आणि लागला तर उरलेला सॉस घाला. आणि लगेच गॅस बंद करून घालणार असाल तर भात्/किन्वा/दलिया घाला, नीट एकत्र करून वाढायला सुरु करा.

टिपा -
  • भाज्या वेगवेगळ्याच परतायच्या ही टीप एका चायनीज शेफने दिली आहे आणि त्याने खरोखर चवीत फरक पडला आणि स्गळ्या भाज्या एकसारख्या क्रंची राहतात.
  • तिखट कमी वाटले तर वाढून घेतल्यावर थोडा चिली सॉस घालून खा.
  • थोड्या करपल्या तरी चालेल पण कढई व्यवस्थीतच तापू द्या.
  • शुगर स्नॅप पीज, वॉटरचेस्टनट्स, कोबी पण यात छान लागतात.


Comments

Popular Posts