भाजीचे सांडगे

महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कुर्डाया, सांडगे येतात. त्यातही भाजीसाठी लागणारे सांडगे एकदम विशेष. पंजाबी बडी / वडी लोकांना माहिती असते पण मराठी सांडगे गावाकडे नक्कीच माहिती असतात. प्रत्येक घराचे करण्याचे  डाळींचे प्रमाण वेगळे पण पद्धत एकच.

पापड, सांडगे, कुरडया म्हणले की मला आठवते ते मम्मीच्या मैत्रिणीचे घर, गच्ची आणि उन्हाळ्याच्या दिवसातल्या सकाळची गडबड. त्यांच्या घराला गच्ची होती पण जिना नव्हता शिडीने ये जा. मी शिडीवर चढायला तिथे प्रथम शिकले. खिच्चे, सांडगे, भातवड्या, कुरवाड्या, उपासाचे पापड, चकल्या एवढे सगळे वाळवणाचे पदार्थ केले जायचे. त्याम्च्या घराचे, आमच्या घराचे असे वेगवेगळे तर कधी एकत्र. त्या सगळ्या मावश्या सुट्टीला माहेरी येत मुंबईवरून मग त्या तिघी, त्या घराच्या  बाकीच्या मामी आणि त्यांची शाळेतली मैत्रीण मम्मी अशी भरभक्कम फळी कामाला असे. आणि लुडबुड करायला त्यांच्याकडची ३-४ मुले आणि आम्ही  दोघे. त्यांच्याकडे मोठी भांडी पाळ्या उलाथणी होती त्यामुळे बरेचदा सगळे तिथेच शिजवायचे असे. मग सकाळपासून आमचा मुक्काम संध्याकाळपर्यंत तिथेच. मम्मीला शिवणाचे काम खूप असेल तर ती यायची नाही पण मी तिथेच असायचे. प्लास्टिकचे पेपर, लहान पळ्या वगैरे गच्चीवर घेऊन जायचे काम आमचे मुलांचे. मोठी शिजवलेली गरम भांडी न्यायाचे काम घराच्या मामा लोकांचे.  मग पटापटा त्या पापड्या घालायच्या सगळ्या बायका.  सांडगे मात्र घरातच ताटात घालून ताडे उन्हात नेली जायची. शेवया, गव्हले, नखुले बोलावे वगैरे पण घरातच करून ताटे उन्हात नेली जायची. उन्हाळ्यात मला असले काय काय करायची फार हुक्की येते पण मी अलीकडे फार काही केले नाही. गेल्यावर्षी मम्मीला सांडगे करताना पाहिले आणि परत काहीतरी करू असे वाटले तोवर उन्हाळा संपला होता.

आज आपण भाजीचे सांडगे कसे करायचे ते पाहू. पुढच्या पोस्टमध्ये त्याची आमटी करण्याची पद्धत पाहू.

Sandage१ कप हरबरा डाळ
१ कप उडीद डाळ
८-९ पाकळ्या लसूण
१-१.५" आल्याचा तुकडा
१.५ टेबलस्पून लाल तिखट (किंवा आवडीप्रमाणे)
चवीपुरते मीठ (२-३ टीस्पून)

कृती - 
डाळी उन्हात कडकडीत वाळवून घ्याव्यात.
मिक्सरवर रवाळ बारीक कराव्यात. एकत्र बारीक केल्या तरी चालतील.
सांडगे घालणार त्याच्या आदल्या दिवशी रात्री डाळींचा रवा एका पातेल्यात घ्यावा.
आले-लसूण छान बारीक वाटून घ्यावे, तो वाटलेला गोळा, लाल तिखट, मोठे डाळीच्या रव्यात घालून पीठ भिजवावे.
पीठ घट्टच असावे, साधारण कणिक असते तितपतच मऊ असावे. पीठ पातळ झाले तर सांडगे कडक होतात.
पीठे झाकून ठेवावे.
सकाळी एखाद्या ताटाला किंचित तेलाचे बोट पुसावे. पाण्यात हात बुडवून पिठाचा गोळा हातात घेऊन १ सेमी साईझचे सांडगे घालावेत. ताटे उन्हात वाळवावीत. पूर्ण खडखडीत वळण्यासाठी ३-४ दिवस लागू शकतात. गडबड  न करता ते नीट वाळू द्यावेत. वाळले की कोरड्या घट्ट झाकणाच्या डब्यात वर्षभर तरी नक्की टिकतात.

टीपा - 
  • यात तूरडाळ किंवा मूगडाळ घालता येते पण आम्हाला आवडत नाहीत म्हणून घालत नाही. 
  • काही लोक कोहाळे खिसुन घालतात तर काही कोथिंबीरपण घालतात. 

Comments