ग्वाकमोले आणि सालसा (Guacamole and Salsa)

भारतातुन इकडे आल्यावर बर्‍याच नविन प्रकारचे पदार्थ ऐकायला आणि पहायला मिळतात. आणि माझ्यासारख्या खवय्यीला तर मग काय खाउ आणि काय नको असे होऊन जाते. पहिल्यांदा जेव्हा चिलिज नावाच्या रेस्टॉरंटमधे गेले तेव्हापासुन मला सालसा आणि ग्वाकमोले खुप आवडायला लागले. मग काकुने मला आव्हाकाडो कसा कपायचा वगैरे शिकवले आणि तेव्हापासुन बरेचदा वेगवेगळ्या प्रकारे करुन पाहिले. आत्ता लिहितेय ती रेसिपी सगळ्यात सोपी आणि आवडीची. अशाच प्रकारे सालसा पण वेगवेगळ्या प्रकारचे करते आणि आवडतात देखील. मी जेव्हा फक्त रॉ फूड खात होते तेव्हा या रेसिपींनी मला बराच हात दिला होता. कारण वेगवेगळ्या स्वादाचे सालसे नुसते वाटीभर-भरुन खायला मजा येते.

ग्वाकमोले
Guacamole

१ आव्हाकाडो
१ टोमॅटो
४-५ टेबल्स्पून चिरलेला कांदा
१ लसूण पाकळी
१ टीस्पून जिरेपूड
चवीप्रमाणे मीठ
१/२ लिंबाचा रस
मुठभर चिरलेली कोथिंबीर
आवडत असेल तर बारीक चिरलेली मिरची १/२ ते १ टीस्पून

कृती:
१. कांदा, टोमॅटो बारिक चिरुन घ्यावा.
२. कोथिंबीरही शक्यतो बारिक चिरलेली असावी
३. मिरची घालायची असेल तर अगदी बारीक चिरुन किंवा वाटुन घ्यावी.
४. लसुण बारिक चिरुन अथवा आले खिसायच्या खिसणीने खिसुन घ्यावा.
५. जिरेपूड, मीठ, लिंबुरस, टोमॅटो, कांदा, लसुण, कोथिंबीर एका बाऊलमधे एकत्र करावे.
६. आव्हाकाडो मधोमध अर्धा करावा. त्यातले बी काढुन टाकावे. त्या कवचातच आव्हाकाडोला उभे-आडवे कप मारुन चिरावे. आता चमच्याने आव्हाकाडोचा गर कवचापासुन वेगळा करुन एका वेगळ्या बाऊलमधे त्यावा. फोर्कने तो गर व्यवस्थित मॅश करावा.
७. मॅश केलेला गर कांदा टोमॅटोच्या गरात व्यवस्थीत मिसळावा.

ग्वाकमोले तय्यार!
टिप:

१. हिरवी मिरची नको असेल तर पिझ्झाबरोबर चिलीफ्लेक्स मिळतात ते थोडे घालायला हरकत नाही.
२. टोमॅटो कांद्याचे मिश्रण आधी करुन ठेवुन ऐनवेळी आव्हाकाडो घालावा. कारण आव्हाकाडो हवेने काळा पडतो.

अव्हाकाडो मॅश न करता कांदा टोमॅटो सारख्या बारीक फोडी करुन त्यात बारीक चिरलेला आंबा, अननस वगैरे घालुन एक प्रकारचा सालसा पण होतो.

सालसा
सर्व प्रकारच्या सालसासाठी खालील साहित्य कमी आधिक प्रमाणात लागते. याव्यतीरिक्त लागणारे साहित्य कॄतीनुसार दिले आहे.

रसदार टोमॅटो
लाल कांदा
कोथिंबीर
हिरवी मिरची
मीठ
लिंबु

क्रमवार पाककृती:

प्रकार १ -
१ वाटी बारीक चिरलेला कांदा, २ वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो, १/२ लिंबाचा रस, १/२ वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरुन किंवा थोड्या भरड वाटुन. हे सगळे नीट एकत्र करुन आवडी प्रमाणे मीठ घालायचे. हा झाला 'पिको दी गायो' (Pico De Gallo) सालसा. आपल्या टोमॅटोच्या कोशिंबीरीत कूट न घालता केले तर हा प्रकार होतो. मिरच्या चविप्रमाणे कमी जास्त करायच्या.

Salsa 2

प्रकार २ -

टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकायचे १ मिनीटात बाहेर काढायचे. आणि थंड पाण्यात टाकायचे. साल काढुन टाकायची. ४ टोमॅटो, १ लहान (खुपच मोठा कांदा असेल तर साधारण १/४ कांदा), १ हिरवी मिरची, असे सगळे चॉपर मधुन काढायचे. प्युरी इतके बारीक न करता भरड ठेवायचे. आवडीप्रमाणे मीठ व कोथिंबीर घालुन थोडे लिंबु पिळले आणि मिसळले की झाला सालसा तयार.

प्रकार ३ -
आवडीनुसार पपई, अननस, आंबा (तोतापुरी प्रकारातला)
कॄती -
पिको दी गायो मधे पपई, आंबा, अननस यापैकी एका फळाचे बारीक तुकडे करुन घालायचे.


Comments

Popular Posts