साबुदाण्याच्या चकल्या


साबुदाण्याच्या पापड्या, बटाट्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स आणि साबुदाण्याच्या चकल्या असले पदार्थ पूर्वी वर्षभराचे करत असत. एकत्र कुटुंबांमध्ये सतत कोणाचे ना कोणाचे उपवास नेहेमी असायचे. मग त्यासाठीची बेगमी आधीच करायला नको? आमच्या घरी मम्मी उडदाचे पापड, सांडगे, कुरवड्या नेहेमी करायची. पण नेहेमी कुणाचे उपवास नसायचे म्हणून मग हे उपवासाचे पदार्थ नेहेमी केले जायचेच असे नाही. एका वर्षी उन्हाळ्यात माझी आजी आमच्याकडे सुट्टीमध्ये आलेली. त्यावर्षी मम्मीने आणि तिने मिळून बरेच पदार्थ केलेले मला आठवतात. त्यात माझ्या आठवणीत राहिलेले म्हणजे साबुदाण्याच्या चकल्या आणि बटाट्याचे पापड. कच्चे पापड आणि कच्च्या चकल्या खाऊन पोट दुखलेले पण चांगलेच आठवतेय.

मम्मी आणि आजी रात्रीच निम्मी आर्धी तयारी करून ठेवायच्या. खाली घालण्यासाठी साड्या, त्यावरचे प्लास्टिकचे कागद व्यवस्थित धुवून वाळवून ठेवणे. ही कामे कारायची तर पाणी जास्त लागते म्हणून ठेवणीतल्या कळश्या घासून पुसून लक्ख करून त्यात पाणी भरून ठेवणे. सकाळची गडबड तर विचारू नका!! दोघींचे हात अगदी भराभरा एका लयीत चालत. मला आठवतेय या दोघींनी मिळून 2-3 किलच्या चाकल्या 2 दिवसात केल्या होत्या.

Sabudana Chakali - just out in sun 

आमच्याकडे महत्वाचे काम असायाचे, दर तासातासाने गच्चीत जाऊन कावळे कशाला तोंड तर लावत नाहीयेत ना? मग वर गेलेलेच आहे तर एखादी अर्धी कच्ची पापडी, चकली तोंडात टाकली जायची. हे पदार्थ अर्धे कच्चे जितके मस्त लागतात तसे इतर कधीच लागत नाहीत असे बच्चे कंपनीचे एकमत असते. आता ना सुट्ट्या राहिल्या ना ते खाणे राहिले ना आयांचे नको म्हणून ओरडणे राहिले!
आता मम्मी पापड वगैरे करत नाही. पण माझी जाऊ दरवर्षी करते. तिची पद्धत मम्मीच्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे. तळल्यावर ही चकली कडक लागत नाही उलट खुसखुशीत लागते. आणि मुख्य म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये भाजली जाते. आज आपण माझ्या जावेची कृती पाहू -

Sabudana Chakali - Dried

१ वाटी साबुदाणा
१/२ किलो बटाटे (शक्यतो मोठे, चिकट नसणारे जुने बटाटे)
१-२ हिरव्या मिरच्या
प्रत्येकी १ टीस्पून - जिरे, जिरे पूड
चवीप्रमाणे मीठ
लागेल तसे पाणी
Sabudana Chakali - Microwaved.


कृती -

साबुदाणा रात्री भिजवायचा (खिचडीला भिजवतो तसा) सकाळी बटाटे कुकरला शिजवून, सोलून कुस्करून घ्यावेत. मिरची, मीठ मिक्सरला वाटून घ्यावे. कुस्करलेले बटाटे, साबुदाणा, मिरचीचे वाटण, जिरे, जिरेपूड एकत्र करून नीट गोळा करायचा. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात हा गोळा ठेवावा, कडेने १-२ पळ्या पाणी सोडून गॅसवर ठेवावे. मध्यम आचेवर गोळा-पाणी नीट मिक्स करावे लागले तर किंचीत पाणी घालावे. एकत्र केल्यावर एक नीट वाफ येईपर्यंत झाकून ठेवावे. तोवर एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीला कडेने छिद्र करावे. मिश्रण थोडे गार करून घ्यावे. बॅगमधे भरुन चकल्या पाडाव्यात. छिद्र सुरुवातीला छोटेसेच असू द्यावे लागले तरच मोठे करावे.

टीपा -
  1. बटाटे आणि साबुदाणा शिजवताना शक्यतो जाड बुडाचे पातेले वापरावे.
  2. गोळा खाली चिटकून जाळणार नाही याकडे लक्ष द्यावे.

Comments

  1. लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. पापडलाटी, बटाट्याचा किस राखण करता करता बरंच खाऊनही व्हायचं.

    ReplyDelete
  2. तुमचे पोस्ट वाचून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही आजी बरोबर चिकवाड्या, बटाट्या चा कीस, सांडगी मिरची, साबुदाणाच्या चकल्या असे वाळवण पदार्थ करायचो.

    ReplyDelete
  3. अर्धे-कच्चे मटकावण्यातच खरी मजा यायची :-)

    ReplyDelete
  4. kurdaichi receipe milel ka, plz!

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Anon,
      Gavhacha Cheek kasa karayacha te ithe diley -http://www.vadanikavalgheta.com/2010/03/celebrating-three-years-of-blogging.html

      To cheek garam garam asatana Shevechya soryatun kaDhun kurdaya karatat.

      Delete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.