कढीगोळे (Kadhigole)

गेल्या महिन्यात कधीतरी एका अश्विनीकडे गेले असताना 'काल आईने कढीगोळे केले होते' असे ती सहज बोलुन गेली. तेव्हा मला अरुंधतीच्या आईने एकदा कढीगोळे खाऊ घातले होते ते आठवले. मम्मी हा प्रकार फारसा करत नसे त्यामुळे खुपच विस्मरणात गेला होता. परवा अचानक भाताबरोबर हेच करु असा विचार आला पण हरभरा डाळ भिजवलेली नव्हती. पण मोड आणण्यासाठी मूग भिजवले होते. काकुना फोन करुन विचारले, होईल का नीट तर काकु म्हणाल्या करुन बघ १-२! शेवटी करुन पाहिलेच! तीच ही रेसिपी -

Kadhigole
गोळ्यांसाठी -
१ कप भिजवलेले मूग
२ हिरच्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
१ बारीक तुकडा आले
१-२ पाकळ्या लसूण
१ टेबलस्पून जिरे
चवीप्रमाणे मीठ
२ टेबलस्पून बेसन अथवा तांदळाचे पीठ

कृती - बेसनाव्यतीरिक्त सर्व सामान मिक्सरवर बारीक वाटुन घ्यावे. अगदी गंधाइतके बारीक नसेल तरी हरकत नाही. एक बाऊलमधे घेउन त्यात बेसन घालुन नीट मिसळावे. त्याचे एक इंच व्यासाचे गोळ करुन बाजुला ठेवावे.

कढीसाठी -
१ कप दही
२ ते अडीच कप पाणी
१ पाकळी लसूण
१ बारीक तुकडा आले
२-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात)
चवीप्रमाणे मीठ
१ टीस्पून साखर
२-३ टेबल्स्पून बेसन
१ टेबल्स्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, हळ्द, कढीपत्ता

कृती - मिरची, आले, लसुण मिस्करवर बारीक वाटुन घ्यावे. दह्याचे पाणी घालुन ताक करुन घ्यावे. ताकात बेसन घालुन पूर्ण गुठळ्या न होऊ देता मिसळावे. आले-मिरचीचे वाटण त्या ताकात घालावे. त्यातच मीठ, साखर आणि हळद घालवी. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवुन जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करुन त्यात तयार केलेले ताक घालावे. गॅस बारीक करुन कढीला नीट उकळी येवु द्यावी. कढी उकळायला लागली की उकळीत एकेक करत गोळे हळुहळु सोडावेत. सगळे गोळे कढीत सोडल्यावर ५ मिनिटे नीट उकळी आणुन गॅस बंद करावा. भाताबरोबर गरम गरम वाढावेत.

टीप - १. कढी थोडी पातळसरच ठेवावी. गोळे टाकल्यावर ती नीट मिळून येते.
२. कढीला उकळी आल्यावर सगळे गोळे एकदम घालण्याऐवजी सुरुवातीला १-२ गोळे घालुन ते फुटत नाहीत ना ते पहावे. फुटले तर गोळ्यात थोडे बेसन किंवा तांदळाचे पीठ घालुन परत गोळे बनवून घ्यावेत व ते कढीत सोडावेत.
३. मुगडाळीच्या साध्या (plain) खिचडीबरोबर ही कढी अप्रतीम लागते.
४. मुळच्या कृतीमधे हरबरा डाळ वाटुन त्याचे गोळे करुन कढीमधे सोडतात. तसे करायचे असतील तरी बाकीची कृती हीच.

Comments

  1. chaan aahe recipe. best part is gole are not fried :-) will make it tomorrow!!

    Thanks,
    Janhavi

    ReplyDelete
  2. mala dudhi chi kadhi chi recipe havi aahe plz post this.........

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.